Ratnagiri Crime : रत्नागिरी पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांना दणका

वर्षभरात ६४ गुन्हे, ९२ जण जेरबंद; १४ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
Drug Smuggling Case |
रत्नागिरी पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांना दणका (Pudhari File Photo)
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : जिल्ह्याला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने धडक मोहीम हाती घेतली असून, गेल्या वर्षभरात तस्करांवर जोरदार प्रहार करण्यात आला आहे. वर्षभरात अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत ६४ गुन्हे नोंदवून तब्बल ९२ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या कारवायांमध्ये ब्राऊन हेरॉईन, हायड्रोपोनिक गांजा आणि एमडी असा एकूण १४ लाख २८ हजार ६४ रुपयांचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या (एनकॉर्ड) जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

कारवायांची तीव्रता वाढवा; एमआयडीसी कंपन्यांची तपासणी करा

अंमली पदार्थांचे उच्चाटन हा केंद्र व राज्य शासनाचा सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचे स्पष्ट करत महामुनी म्हणाले, वर्षभरातील कारवाई समाधानकारक असली, तरी आता या मोहिमेला अधिक गती देणे गरजेचे आहे. एमआयडीसी परिसरातील संशयास्पद हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच बंद कारखाने यावर पोलिस, एमआयडीसी प्रादेशिक अधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवून कंपन्यांची कसून तपासणी करावी.

सागरी सुरक्षेवर भर; बोटींवरील परप्रांतीय कामगारांची होणार तपासणी

रत्नागिरीच्या विस्तीर्ण सागरी किनाऱ्याचा गैरवापर रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने अत्यंत दक्ष राहावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व मासेमारी बोटींची नियमित तपासणी करण्यात यावी, विशेषतः या बोटींवर काम करणाऱ्या नेपाळी व परप्रांतीय कामगारांच्या पार्श्वभूमीची आणि त्यांची बारकाईने पडताळणी करावी, असे निर्देशही महामुनी यांनी दिले.

जनजागृतीची व्याप्ती वाढवण्याचे आवाहन पोलिस दलाने ग्रामसभांच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी आणि सायबर गुन्हेगारीविरोधात जिल्ह्यात प्रभावी जनजागृती केली आहे. शिक्षण विभागानेही यात उत्तम भूमिका बजावली असून, आता सर्वच शासकीय यंत्रणांनी ही लढाई स्वतःची मानून मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.