New Year Celebration : उत्तर रत्नागिरीतही थर्टी फर्स्ट दणक्यात
चिपळूण : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर चिपळूणसह उत्तर रत्नागिरीत नववर्षाच्या जल्लोषासाठी लाखो रुपयांची दारू रिचवली गेली. या शिवाय चिकन, मटणवर ताव मारण्यात आला. यंदा थर्टी फर्स्टला बुधवारच असल्याने खवय्यांनी मोठ्या प्रमाणात खाण्यावर खर्च केला. या दरम्यान पोलिसही सतर्क झाले होते. चिपळूणमध्ये तर मद्य प्राशन करून मोटारसायकलवरून फिरणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले होते. येथील गुहागर, वेळणेश्वर, हेदवी तसेच मुरूड, हर्णै, आंजर्ले, केळशी या समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होती. यामुळे गेले चार-पाच दिवस बाहेरगावहून आलेल्या पर्यटकांना राहण्यासाठी मोठी गैरसोय निर्माण झाली. लॉज, रिसॉर्ट सर्वच फुल्ल असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांना निवास व्यवस्थेसाठी शोधाशोध करावी लागली. विशेष म्हणजे या दरम्यान मास्यांचे दरदेखील गगनाला भिडले. कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, पुणे, मुंबई व महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेळी दाखल झाले. थंडीचा वाढलेला गारठा आणि दाट धुके याचा आनंद पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर तर घेतलाच, या शिवाय गावखेड्यामध्ये तयार झालेल्या होम-स्टे मध्ये देखील अनेक पर्यटक शेकोटीचा आनंद घेत होते. त्यामुळे चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड येथील हॉटेल्स, होम-स्टे, रिसॉर्ट, लॉजिंग हे गर्दीने फुलून गेले होते. त्यामुळे गेल्या आठवडाभरात थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर उत्तर रत्नागिरीत कराडोंची उलाढाला झाली.
दुसऱ्या बाजूला स्थानिकांनी लाखोंचे मद्यदेखील रिचविले. थर्टी फर्स्टच्या मुहूर्तावर चिकन, मटण यावरही खवय्यांनी ताव मारला तर अंडी व्यावसायिकांचा देखील मोठ्या प्रमाणात धंदा झाला. नववर्षाच्या स्वागतासाठी रात्री 12 वा. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. यामुळे फटाके व्यावसायिकांचा देखील चांगला धंदा झाला. 31 डिसेंबरच्या रात्री ठिकठिक़ाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस चौकाचौकात उभे होते तर गस्तही सुरू होती. या दरम्यान मद्य प्राशन करून मोटारसायकल चालविणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. दिवसभर चिकन, मटण दुकानांमध्ये ग्राहकांनी रांगा लावल्या होत्या. गोव्यापेक्षा कोकणात थांबणे पर्यटकांनी पसंत केले आणि थर्टी फर्स्टचा आनंद लुटला. विशेष म्हणजे या ठिकाणी सहकुटुंब थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी पर्यटक खासगी वाहनाने येताना पाहायला मिळाले. यामुळे मुंबई-गोवा महामार्ग वाहनांनी फुलून गेला होता.

