

रत्नागिरी : यंदा पावसाने मुक्काम वाढवल्याने व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक हातातून गेले. दरम्यान, जानेवारी महिना उजडला तरी हिवाळ्यात भाज्यांचे दर वाढलेलेच आहेत. कोणतीही भाज्या 20 ते 30 रूपयेच्या खाली पावकिलो मिळत आहे. कांदा, बटाट्याचे दर स्थिर आहेत. हिरवी मिरची, गवार, पावटा, फरसबी, मटार, कांदापात महागले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत असून असल्या महागाईत खायचे काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. महागाईमुळे महिलांच्या किचनमधील आर्थिक गणित बिघडले आहे.
पावसाळ्यात यंदा पावसाने चांगली हजेरी लावली होती. सर्वच ठिकाणी पिके बहरली होती. मात्र अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, विर्दभ, कोकण, मराठवाडा येथील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे ऐन हिवाळ्यात भाजीपाल्यांची आवक कमी झाली. त्यामुळे दर वाढलेलेच आहेत. आता नवीन वर्षात भाजीपाला वाढले मात्र दरही वाढलेले आहे. हिवाळा संपत आला असून बाजारात फळे, विविध प्रकारची पालेभाज्या आलेल्या आहेत. कांदा, बटाटा, मटार, गाजर, पावटाशेंगा, वांगी, मुळा यासह विविध भाज्या विक्री होत आहेत.मटार 100 ते 120 रूपये दराने विकत आहेत. तर कांदापात 30 रूपयास एक, वांगी 70 रूपये किलो, टोमॅटेो 80 रूपये किलो, मेथी, पालक, शेपू या 20 ते 30 रूपये जोडीने विक्री सुरू आहे.
‘या’ पालेभाज्यांना मागणी
रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठेत मुळा, माठ, मेथी, शेपू, मोहरी, पालक, चवळी, कांदापात, पावटा यासह विविध पालेभाज्या विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. एका जुडीला 30 रूपये तर दोन जुड्या घेतल्या तर 50 रूपये मोजावे लागत आहे. हिवाळ्यात मेथी, पालक, मोहरी, मुळाला मोठी मागणी असून नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत.
कांदा, बटाट्याचे दर स्थिरच
रत्नागिरी जिल्ह्यातील बाजारात मागील काही महिन्यापासून नवीन कांदा, बटाटा न आल्यामुळे जुनाच स्टॉक विक्रीस ठेवण्यात आल्यामुळे कांदा, बटाट्याचे दर अद्याप स्थिरच आहेत. 30 ते 35 रूपये किलो दराने कांदा विक्री होत आहे. शहरासह काही तालुक्यात नवीन लाल कांदा आल्यामुळे एका किलोस 35 रूपये घेण्यात येत आहे. काही बाजारात कांदा, बटाटे शंभर रूपयास चार ते पाच किलो विक्री होत आहे.