नाणीज : नाणीजक्षेत्री आज भक्ती व शक्तीचा जणू मळाच फुलल्यासारखे दृश्य होते. एकीकडे पावसाच्या सरी, तर दुसरीकडे भाविकांच्या गर्दीचा महापूर. अशा निसर्गरम्य वातावरणात आज येथे चैतन्याचा सोहळा म्हणजेच गुरूपौर्णिमा उत्सव साजरा झाला. लाखो भाविकांनी एकाचवेळी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे पूजन केले. सर्वांच्या चेह-यांवर सोहळ्यात सहभागी झाल्याचा आनंद, उत्साह, समाधानाचे भाव जाणवत होते.
आज पहाटेपासूनच सुंदरगडाला जाग आली होती. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा, छत्तीसगड अशा अनेक राज्यांतून भाविक श्रीक्षेत्री दाखल झाले होते. गुरुपूजनाचा कार्यक्रम साडेआठला सुरू झाला, परंतु भाविक सकाळी सारे आवरून सकाळी सहा पासूनच पूजेच्या तयारीने सुसज्ज होऊन बसले होते. सोहळा सुरू होण्याअगोदर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे सुंदरगडावर आगमन झाले तेव्हा भाविकांनी उस्फूर्तपणे एकच जयघोष सुरू केला. त्यांनी प्रथम संतशिरोमणी गजानन महाराज मंदिरात जाऊन सर्व देवतांचे दर्शन घेतले. नंतर संतपीठाजवळ येताच सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर टाळ्यांच्या गजरात त्यांचे संतपीठावर आगमन झाले.
जगद्गुरूंनी हात उंचावून सर्वांना आशीर्वाद दिले. गर्दीतील इचलकरंजीच्या सौ. व श्री कुमार चव्हाण या जोडप्याला संतपीठावर पूजा करण्याची संधी मिळाली. भालचंद्रशास्त्री शौचे गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा सुरू झाला.
या सोहळ्यास प.पू. कानिफनाथ महाराज, सौ. सुप्रियाताई, सौ. ओमेश्वरी ताई, देवयोगी, सिंदूरअंबिका असा जगद्गुरूश्रींचा सारा परिवार उपस्थित होता. हा सोहळा संपल्यानंतर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजीनी सर्वांना शुभाशीर्वाद देताना आजची गुरूपौर्णिमा ही सर्वांसाठी पर्वणी होती व त्यातून सर्वांच्या जीवनाचे सोने होऊदे असे आशीर्वाद दिले.
काल सकाळी सुरू झालेले सर्वारोग्य शिबीर आज दुसर्या दिवशीही सुरू होते. दिवसभर अनेक भक्तांनी त्याचा लाभ घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांनी येथे रुग्ण तपासणी करुन औषधे दिली. दुसरीकडे महाप्रसादालाही दिवसभर गर्दी होती. भाविक रांगेने प्रसाद घेत होते.