

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात चार नगर परिषद व तीन नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार 2 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात 1 लाख 60 हजार 466 शहरी भागातील मतदार या निवडणुकीसाठी मतदान हक्क बजावणार आहेत. जिल्हा प्रशासनाने यासाठी निवडणूक होणार्या प्रत्येक भागात मोठी तयारी केली आहे. सोमवारी प्रभागानुसार सर्वत्रच मतपेट्यांचे वाटप करून, त्यांना मतदान केंद्रांवर रवाना केले.
नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. थेट नगराध्यक्षपद आणि 30 नगरसेवकपदांसाठी ही निवडणूक होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. यासाठी पालिका प्रशासन सज्ज असून सुमारे 69 मतदान केंद्रावर 64 हजार 764 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
सोमवारी रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. आता गुप्त प्रचारावर भर देण्यात आला आहे. पालिकेच्या या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडीसह काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष असे अनेक उमेदवार रिंगणात आहेत. प्रचाराची धूम सुरु असून अनेक नेत्यांचे दौरे, सभा, कॉर्नर सभा, वैयक्तिक गाटी-भेटी होत आहेत.
महायुती की महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार याकडे नागरिकांचेही लक्ष लागून राहिले आहे. रत्नागिरी नगर परिषदेसाठीही प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्तासह प्रात्यक्षिकही घेण्यात आली. 158 पोलिस आणि 24 होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 69 मतदान केंद्रांवर प्रत्येकी 4 आणि राखीव असे 390 महसूल कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदान यंत्रांची कर्मचार्यांसमोर प्रात्यक्षिकही करण्यात आली. रत्नागिरीत पालिकेच्या 16 प्रभागांमध्ये 69 मतदान केंद्र असून 64 हजार 746 मतदार आहेत. यामध्ये 31 हजार 324 पुरूष तर 33 हजार 421 महिला मतदारांचा सामावेश आहे. लांजा नगर पंचायतीमध्ये एकूण 19 मतदान केंद्रे असून 14232 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात असून 17 नगरसेवकपदांसाठी 46 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत.
राजापूर नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी तीन तर नगरसेवक 20 पदासाठी 51 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 8,143 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याठिकाणी दहा मतदान केंद्र आहेत. याठिकाणी 3 हजार 924 पुरुष तर 4 हजार 217 महिला मतदार आहेत. देवरुख नगर पंचायतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी पाच तर 17 नगरसेवकपदासाठी 65 उमेदवार रिंगणात आहेत.
देवरुखमध्ये 17 मतदान केंद्र असून एकूण 10 हजार 789 मतदार आहेत. यात 5 हजार 581 स्त्री तर 5 हजार 208 पुरुष मतदार आहेत. चिपळूण नगर परिषदेसाठी 42 हजार 582 मतदार मतदान करणार असून यामध्ये 21 हजार 596 महिला व 20 हजार 986 पुरुष मतदार आहेत. 26 नगरसेवक पदासाठी 110 तर नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार रिंगणात असून चिपळुणातील निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. एकूण 48 मतदान केंद्र आहेत.
गुहागर नगर पंचायतीसाठी मंगळवारी मतदान होणार असून या ठिकाणी 5 हजार 961 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याठिकाणी 2 हहजार856 पुरुष तर 3 हजार 105 स्त्री मतदार असून एकूण 17 मतदान केंद्र आहेत. गुहागरमध्ये नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत होत असून 17 नगरसेवक पदासाठी 40 उमेदवार रिंगणात आहेत.
खेडमध्ये 10 प्रभागांमध्ये 20 मतदान केंद्रे असून मतदान केंद्रांवर एकूण 100 कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. यात प्रत्यक्ष मतदान केंद्रांच्या ठिकाणी 80 कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी 20 यांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून मतदान यंत्रे मतदान प्रक्रियेसाठी रवाना झाली.