नांदगाव : पुढारी वृत्तसेवा
मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण ते तळेरे जाणाऱ्या लेनवर साळीस्ते स्मशानभूमीनजीक वळणावर कंटेनरला दुचाकीची मागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार विशाल विजय लिंगायत (वय २२, रा. साळीस्ते-रामेश्वरवाडी, ता. कणकवली) याचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दु. १२.३० वा. च्या सुमारास घडला.
विशाल हा तळेरे-वाघाचीवाडी येथील पेट्रोल पंपावर कामाला होता. स. ११.३० वा. दाढ दुखत असल्याने डॉक्टरकडे जाण्यासाठी पैसे आणण्यासाठी त्याच्या मित्राची दुचाकी घेऊन घरी गेला होता. त्यानंतर घराकडून माघारी परतत असताना साळीस्ते स्मशानभूमी येथे महामार्गाच्या बाजूला एक कंटेनर निष्काळजीपणे उभा होता. विशाल याच्या दुचाकीची कंटेनरला मागून धडक बसली.
या धडकेत दुचाकीच्या पुढील भागाचे नुकसान झाले, तर विशाल याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्राव झाला. रक्तस्राव झाल्याने उसकी प्रकृती चिंताजनक झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत त्याला तातडीने तळेरे बाजारपेठ रुग्णवाहिकेने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
विशाल हा आपल्या काकांसोबत साळीस्ते येथे राहत होता. त्याच्या पश्चात वडील, आई, बहीण असा परिवार असून, त्याचे आई, वडील, बहीण मुंबई येथे कामानिमित्त राहतात.
अपघाताची फिर्याद विशालचे काका मयुरेश लिंगायत यांनी दिली.
याप्रकरणी कंटेनरचालक पुरुषोत्तम नंदलाला उपाध्याय (६५, रा. मध्य प्रदेश) यांच्याविरुद्ध कंटेनर रस्त्यावर निष्काळजीपणे उभा करून विशाल याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.