

रत्नागिरी ः डिजिटल युगात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात पारदर्शकता यावी यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने मेरी पंचायत ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून ग्रामस्थांना आता आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार घरबसल्या एका क्लिकवर कळणार आहे. जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींमध्ये हे ॲप दिसणार आहे.
केंद्र तसेच राज्य शासनाकडून ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. विकासात येणारे अडथळे दूर व्हावेत यासाठी थेट ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला जात आहे. ग्रा. पं. च्या कारभारात पारदर्शकता असावी व आपल्या ग्रा. पं. च्या हद्दीत काय विकास सुरू आहे. गावात कोणत्या योजना आल्या आहेत? शासनाकडून किती निधी मिळाला? आदी माहिती सहजरित्या उपलब्ध होणार आहे. त्यासाठीच केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने मेरी पंचायत ॲप आणले आहे. मेरी पंचायत ॲप हे केंद्र सरकारचे एक डिजिटल व्यासपीठ आहे. नागरिकांना ग्रामपंचायतीचा कारभार, विकास कामे, निधीचा वापर आणि विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे.
हे ॲप ग्रामीण भागात ई-गव्हर्नन्स सुधारण्यासाठी पंचायतीच्या कामांत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी व प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी पंचायत राज मंत्रालयाने विकसीत केले आहे. स्थानिक पातळीवरील एखाद्या विकास कामाची सूचना फोटोसह सूचित करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊ शकता. तसेच काही समस्यांचे फोटो अपलोड करून झालेल्या कामातील चुका किंवा त्या कामाचे कौतुक समोर आणता येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या कामाबाबत ग्रामस्थांना आपला अभिप्राय नोंदवता येणार आहे.. मेरी पंचायत ॲ ने आर्थिक बाबींचा संपूर्ण लेखाजोखा ग्रामस्थांसमोर येणार आहे. त्यामुळे आपल्या गावांशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन वेळ घालवावा लागणार नाही.