

देवरुख : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान समितीने नवीन नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी भारतीय संस्कृतीला साजेसा पोशाख (ड्रेस कोड) आणि पावसाळ्यातील सुरक्षेच्या दृष्टीने दर्शनाच्या वेळेत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
श्री मार्लेश्वर देवस्थान समितीने केलेल्या आवाहनानुसार, मंदिरात येताना भाविकांनी आपला पेहराव हिंदू परंपरेला अनुसरून, सुसंस्कृत आणि शुचिर्भूत असावा. अंगभर वस्त्र परिधान करूनच श्री स्वयंभू मार्लेश्वराचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे मंदिराच्या परिसरातील पावित्र्य आणि लाभलेला सांस्कृतिक वारसा टिकून राहील, असे समितीने म्हटले आहे.
विशेषतः पावसाळ्यात श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून, दर्शनाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. यापुढे, श्री मार्लेश्वर मंदिर सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच भाविकांसाठी खुले राहील. सायंकाळनंतर संभाव्य धोके टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तरी सर्व भाविकांनी या नियमांचे पालन करून देवस्थान समितीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.