Teachers Protest : मार्चचा पगार आता वाढीव टप्प्याने मिळणार

मुंबईत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा; अंशत: अनुदानित शिक्षकांचे आंदोलन स्‍थगित
Teachers Protest
मुंबई : आझाद मैदानावर आंदोलनावेळी मंत्री दादाजी भुसे,
Published on
Updated on

माखजन : महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना मार्च २०२७ चा पगार वाढीव २०% ने खात्यात जमा होईल, अशी घोषणा आझाद मैदान मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी केली. वाढीव २०% साठी लागणारी रक्कम अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. यामुळे अंशतः अनुदानित शिक्षकांचे, शिक्षक समन्वय संघाच्या बॅनरखाली सुरू असलेले आंदोलन स्थगित झाले आहे.

राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा, तसेच ३० दिवसाच्या आत त्रुटी पूर्ण करणाऱ्या संबंधित शाळाना मानीव टप्पा देऊन, वेतन अनुदानाच्या समान टप्प्यावर आणावे, या प्रमुख मागण्यांसाठी २२ जूनपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु होते. या आंदोलनाला अखेर यश आले आहे.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व आंदोलनाची ताकद वाढवण्यासाठी आ. रोहित पवार, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांनी आझाद मैदानात दिवस-रात्र काढली. शिक्षकांच्या या गंभीर प्रश्नाकडे शासनाने लक्ष देण्यासाठी, शिक्षक समन्वय संघाने खासदार व माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती.

टप्पा वाढीच्या विषयात नेहमीच मध्यस्ती करणाऱ्या जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आ.मंगेश चव्हाण यांनी यावेळीही महत्वाची भूमिका बजावत शिक्षकांना न्याय मिळवून दिला. आझाद मैदानावर असलेली सुमारे १५ हजार शिक्षकांची संख्या यामुळे, अखेर १० जुलै रोजी खऱ्या अर्थाने आंदोलनाला यश आले. १० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण विभागाचे व अर्थ खात्याचे अधिकारी, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्यात बैठक झाली. वादळी चर्चेअंती अंशतः अनुदानित शिक्षकांना १ मार्च २०२७ पासून वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचे ठरले. अतिरिक्त लागणाऱ्या निधीची तरतूद ही अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्याचे निश्चित झाले. झालेला निर्णय शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, संकटमोचक म्हणून भूमिका बजावणारे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी थेट आझाद मैदानात येत आंदोलनकर्त्यांसमोर घोषित केला.

शिक्षकांच्या खात्यात वाढीव टप्प्याचा पगार ३१ मार्चपूर्वी टाकला जाईल, असे मंत्री गिरीष महाजन यांनी घोषित केले. यावेळी आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. किशीर दराडे, आ. विक्रम काळे, आ. किरण सरनाईक, आ. मंगेश चव्हाण, आ. ज. मो. अभ्यंकर, मंगेश चिवटे आदी उपस्थित होते. यावेळी टप्पा वाढ ही २०१४ च्या शासन निर्णयानुसार नैसर्गिक टप्पा वाढ लागू करा, असा आग्रह शिक्षक समन्वय संघाकडून करण्यात आला. यावर दादाजी भुसे यांनी १ मार्चपासून टप्पा वाढ ही निश्चित झालेली आहे. परंतु आपल्या अन्य ज्या काही मागण्या आहेत, त्यावर बैठक घेऊन आपण तोडगा काढू, असे आश्वस्त केले.

१ मार्च २०२७ ला टप्पा वाढ दिल्याने शिक्षक समन्वय संघाकडून आंदोलन मागे घेण्यात आले. १ मार्च २०२७ ला टप्पा वाढ देताना लागणारी तरतूद ही अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली जाईल, यासाठी शिक्षकांना कोणतेही आंदोलन करावे लागणार नाही, याची हमी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थित शिक्षकांना दिली. अंशतः अनुदानित शिक्षकांना टप्पा वाढ दिल्याने, शिक्षक समन्वयकडून महायुती सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news