Maharashtra Krishi Din | संपदा आणि राहुल कुलकर्णी यांचं कसं आहे 'आनंदाचं शेत'? अभिनेत्री शेतीकडे कशी वळली?

Maharashtra Krishi Din Sampada and Rahul Kulkarni | अभिनेत्री संपदा आणि राहुल कुलकर्णी यांचं कसं आहे 'आनंदाचं शेत'?
image of Sampada and Rahul Kulkarni
Sampada and Rahul Kulkarni Maharashtra Krishi Din (Pudhari Photo)
Published on
Updated on
संपदा आणि राहुल कुलकर्णी, आनंदाचं शेत कृषी पर्यटन होम स्टेचे शेतकरी
Summary

लेख लिहिते आहे माझ्या आणि राहुलच्या छोट्याशा प्रवासाचा. कर्तृत्वाचा आलेख वगैरे नाही, पण समंजस व्रताची कहाणी असेल ही. माझ्या आदर्श डॉ. स्नेहलता देशमुख यांची आठवण काढून पुढे जाते. त्यांचं नेहमीचं सांगणं की आपण पणती व्हावं, जिवंत ज्योत. ज्योतीने ज्योत उजळवतां येते. नुसताच प्रकाश नाही. त्या प्रकाशाला तेज हवं जे दुसर्‍यालाही पणती होण्याची प्रेरणा देईल. ‘आनंदाचं शेत’च्या आनंदी प्रवासात हे वाक्य नकळतच समोर राहिलं.

Maharashtra Krishi Din special Sampada and Rahul Kulkarni's Farm of Happiness

ठाणे नावाच्या शहरात लहानाचे मोठे झालेले आम्ही नवरा बायको. राहुल आणि संपदा कुळकर्णी. जन्म, शाळा, महाविद्यालयीन आयुष्य, करिअर हे ठाणे आणि मुंबई सारख्या कमालीच्या वेगवान शहरातले. मनाजोगतं शिकून आवडत्या क्षेत्रात करिअर, मग अजून काय हवे आयुष्यात? मी अभिनय क्षेत्रात तर राहुल जाहिरात क्षेत्रात. माझे एकापाठोपाठ नाटक, मालिका, नृत्य या क्षेत्रात जम बसवणे आणि राहुलचे जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून कमर्शियल आर्टमध्ये पदवी घेऊन छान चढत्या क्रमाने यशस्वी होत जाणे याची एक धुंदी येत गेली. बस, आयुष्य एकदम सेट (स्थिर) झालेले. वयाच्या अगदी लवकर कामाला लागलेले आम्ही काम तर करत होतो; परंतु पुढे हे असे आणि असेच किती काळ? या विचाराने आम्ही वयाच्या चाळीशीनंतर काही वेगळे जगायचे असा विचार करत होतो. परंतु वेगळे म्हणजे काय? याचे उत्तर आमच्याकडे नव्हते. याच महत्वाच्या काळात (2005 सालात) आम्ही फिरायला गेलो.

Maharashtra Krishi Din
(Pudhari Photo)

नेरळ इथे, ‘सगुणाबाग‘ या कृषी पर्यटन ठिकाणी. शनिवार, रविवारचा विरंगुळा एवढाच उद्देश. परंतु हा ‘विरंगुळा‘ आमचे पूर्ण आयुष्य बदलून गेला. सगुणाबागचे सर्वेसर्वा कृषीभूषण चंद्रशेखर भडसावळे त्यावेळी त्यांच्या शेतात फेरफटका मारायला आम्हाला आणि तिथे आलेल्या अनेक पर्यटकांना घेऊन गेले. शेती, त्याचा व्यवसाय, त्याबरोबरीने पर्यटन अशा अगम्य विषयांची ते चर्चा करत होते. काही कळत होते, काही डोक्यावरून जात होते. परंतु पुढे काही वर्षांनी आपल्याला अन्नदुर्भिक्ष (फुड स्केअरसिटी) या संकटाशी सामना करायला लागेल, असे म्हणून ते साध्या साध्या उदाहरणांवरून पटवून देत राहिले. प्रत्येकाला डॉक्टर, इंजिनियर, कलाकार, खेळाडू, शिक्षक, प्राध्यापक, पायलट, आयटी अशी क्षेत्र निवडायची आहेत; परंतु कोणाला शेतकरी व्हायचे नाही ही वास्तवाची जाणीव करून देत राहिले.

अन्न आपली मूलभूत गरज आहे जी दुसरे कोणीतरी पूर्ण करत राहील, या भ्रमातून बाहेर यायची आता गरज आहे, ही महत्वाची गोष्ट त्यांनी प्रभावीपणे सांगितली आणि आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले. जणू चाळीशीनंतर वेगळे काहीतरी करायचे म्हणजे नेमके काय करायचे याचे उत्तरच त्यांनी आम्हाला दिले. भूमिपुत्रांनो निदान ज्यांची स्वत:च्या नावावर भूमी आहे, त्यांनी तरी भूमिकडे परत जा, या त्यांच्या वाक्याने आम्हाला जागे केले. अनेक दिवस विचार मंथन झाले आणि आम्हाला आमचे मार्ग दिसायला सुरुवात झाली. अनेक व्यक्तींना भेटणे, वाचणे, प्रत्यक्ष शेती क्षेत्रे पाहाणे हे सुरू झाले. परंतु माझ्यासाठी ही काही नाटकातील भूमिका नाही की काही काळ केली आणि मग संपली. किंवा राहुलसाठी ही जाहिरातीची चकचकीत कल्पना नाही की कंपनीला सुचवली आणि आपले कर्तव्य संपले.

Maharashtra Krishi Din
(Pudhari Photo)

कोकणात शहरापासून दूर शेती करून अन्न उगवायचे ही भावना सुखावणारी पण 30/35 वर्ष माणसांच्या गराड्यात राहिलेले आम्ही दोघे वेगवान शहरापासून दूर केवळ शेती करून राहू शकू का? याचा प्रामाणिक विचार करू लागलो आणि शेती बरोबरीने भडसावळे यांच्याच पावलावर पाऊल ठेवून शेती करता करताच शेतीचे पर्यटन क्षेत्र करायचे ही कल्पना आम्हाला अंमलात आणणे जास्त योग्य वाटले. आम्हाला शेतीत पाऊल घट्ट रुतवायला कारणीभूत झाले. आधीचे करिअर जसे आवडत्या क्षेत्रातले होते तसेच आता जे करायचे तेही आनंददायी असायला हवे ही अपेक्षा ठाम केली. शेती ही चांगल्या आणि रसायन विरहीत पद्धतीने करायची, सकस अन्नासाठी करायची हे ठरवले. शेती आपल्याला अन्न देईल आणि पर्यटन आपल्याला हा सर्व भार तोलून धरण्यासाठी आर्थिक बळ देईल शिवाय आपल्या माणूसप्रिय स्वभावाला अनेक माणसांना भेटते ठेवेल हा विचार पक्का झाला.

कामाला सुरुवात झाली. आधी नोकरी करून केवळ शनिवार, रविवार येऊन जाऊन शेतीच्या अनुभवाला, कामाला सुरुवात झाली. राहुलने या काळात जीवाचे रान केले. कृषी पर्यटनातला ‘कृषी’ चा नेमका अर्थ समजून घेतला विविध पिकांच्या शेतीला आणि अभ्यासाला सुरुवात केली आणि मग पर्यटनासाठी वास्तू बांधणी करून तेही सुरू झाले. फार्म ऑफ हॅपीनेस या नावाने अर्थात ‘आनंदाचं शेत‘ हे कृषी पर्यटन स्थळ उभे राहिले.

Maharashtra Krishi Din
(Pudhari Photo)

काम करता करता समजत गेले की आपल्याला प्रामाणिकपणे हा अनुभव पर्यटकांना द्यायचा तर तो परिपूर्ण कोकणातला (आम्ही कोकणात यायचे ठरवले म्हणून कोकण. अन्य प्रदेशातल्या व्यक्तिसाठी वेगळा प्रदेश असूच शकतो) आणि शेतीतला असायला पाहिजे. कारण तेच करणे आमच्या कोकणातल्या शेतीत संयुक्तिक आणि सहजसाध्य होते. 10 वर्षांपूर्वी कृषी पर्यटन, घरगुती आदरातिथ्य हे सर्व पर्यटन क्षेत्रालाही आणि अर्थातच आम्हालाही नवीनच होते. परंतु तरीही आमच्या विचाराने उभे केलेले शेणाने सारवलेले कौलारू घर, उत्तम महाराष्ट्रीय पद्धतीचे अन्न, स्वच्छ निवास आणि जोडीला अन्नाबद्दलची सजगता देण्यासाठी स्वत:च्याच शेतातून अभिमानाने स्वअनुभवातून मिळवलेले ज्ञान शेअर करण्यासाठी ‘शेत सफर’ (फार्म टूर) आणि आपुलकीने केलेले 2-3 दिवसांच्या निवासातले आदरातिथ्य ह्या स्वरूपात कृषीपर्यटन सुरू झाले. आता या शेती प्रवासाला 16 वर्ष पूर्ण होत (2007 साली सुरुवात) आहेत आणि पर्यटनाला (घरगुती आदरातिथ्याला / होम स्टेला 16 जानेवारी 2014 साली सुरुवात) 10 वर्ष पूर्ण होत आहेत. भात, नाचणी, हळद, पावटा, कुळीथ, कारळे / खुराष्णी, कंद यांची शेती. आम्हाला पुरतील एवढ्या काकडी, दोडका, पडवळ, कारली, घेवडा, मिरची, वांगी, पालेभाज्या (ऋतूप्रमाणे) या भाज्या आणि जोडीला आंबा, नारळ, काजू, फणस यांचे माफक उत्पन्न घेत आहोत.

Maharashtra Krishi Din
(Pudhari Photo)

16 सहकारी, डझनभर गुरे, कोंबड्या, संरक्षणासाठी विनी, काली, काळू नावाचे इमानदार आणि जिव्हाळ्याचे कुत्रे हा एवढा कुटूंब कबिला आमच्या पाठीशी उभा आहे. या सर्वांबरोबरीने अतिशय अभिमानाने सांगायची गोष्ट म्हणजे हे सगळं माझ्या कोकणाचे ‘कोकणपण’ सुरळीत ठेवून करतो आहोत. पर्यटनाच्या कारणाने इथे प्लास्टिक कचरा होणार नाही, माझ्या अवतीभवतीच्या पशूपक्षांचा निवास कुठेही असुरक्षित होणार नाही, गावाचे जनजीवन कुठेही विस्कळीत होणार नाही याची काळजी घेत घेत आणि स्थानिक मंडळींना यात सहभागी करून घेत पुढे जात आहोत. मला माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या, संगमेश्वर तालुक्यातल्या ‘फुणगुस’ गावाला अजिबात गोवा, कॅलिफोर्निया किंवा अगदी स्वर्गही करायचे नाही. त्याचे ‘फुणगुस‘ स्वरूपच जपायचे आहे. भरपूर निसर्गात वसलेल्या या टुमदार गावाला आम्ही कोण काय स्वरूप देणार? त्याचे असलेले रूपच अधिकच श्रीमंत आहे. यावर माझा आणि राहुलचा ठाम विश्वास आहे.

image of Sampada and Rahul Kulkarni
Ratnagiri : दापोली कृषी विद्यापीठाचा सुवासिक तांदूळ वाढवणार जिभेची गोडी!

काहीतरी जगावेगळे करायचे म्हणून आम्ही कोकणात आलो नाही, याचे भान कायम ठेवतो आहोत. आम्ही करत असलेल्या शेतीत आणि पर्यटनातल्या खरेपणात, साधेपणा आणि स्वच्छतेतही खूप काही ताकद आहे, हे जाणून आहोत. चांगल्या हेतूला चांगला प्रतिसादही मिळत गेला. आनंदाचं शेत आनंद देणारे आणि आनंद घेणारे कसे राहील हे एवढेच आमचे ध्येय आहे. स्पर्धा नाही, घाई नाही, थिंक बिगचा आक्रोश नाही, हे आणि एवढेच वातावरण आनंद निर्मितीला पुरेसे आहे. पर्यटन व्यवसायाचा हात धरल्यामुळे शेतीकडून काही ओरबाडावे लागत नाही आहे. निसर्गाच्या लहरीपणाला झेलतही सत्वयुक्त शेती आम्हाला पुरते आहे. आमच्या आमच्या गुणांसकट डोळस शेती करतो आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी शेतीत यावे आणि तिला आपल्या आपल्या क्षेत्रातील ज्ञानाची जोड देत सन्मानाने जगापुढे न्यावे हे सतत सांगण्याचे ध्येय मात्र आम्ही बाळगून आहोत. त्याबद्दल आमच्या शेत सफरीत आग्रहाने बोलत राहातो.

Maharashtra Krishi Din
(Pudhari Photo)
image of Sampada and Rahul Kulkarni
Maharashtra Farmer News | शेतकऱ्यांना शेती साहित्य, अवजारांसाठी अनुदान

हे सर्व यशस्वी करण्यासाठी आम्ही काय करतो?

1) आम्ही खरीखुरी शेती करतो आणि आगाऊ/आधी बुकींग करून आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य प्रेमाने आणि आनंदाने करतो.

2) पाहुणे हाच शब्द वापरतो कस्टमर नाही.

3) आमच्याकडे काम करणार्‍या व्यक्तींना ‘सहकारी’ म्हणतो, गडी किंवा कामगार नाही. सन्मानाने वागवतो. म्हणून ते आमच्याबरोबर इथल्या पहिल्या दिवसापासून आहेत.

4) सोशल मीडियाबद्दल जागृक आहोत. आमच्या वेबसाईटच्या माध्यमाद्वारे जगापर्यंत पोहोचत आहोत. या माध्यमांचा योग्य तेवढाच आणि योग्य तिथेच वापर करतो. स्वत:चे यूट्यूब चॅनल आहे, त्यावर शेती आणि कृषी पर्यटनाविषयी सजगता निर्माण करतो.

5) आमच्याकडे काय आणि कोणत्या सुविधा आहेत, याची प्रामाणिक माहिती देतो.

6) पर्यटकांना जसा पर्यटन स्थळ निवडण्याचा हक्क आहे तसेच आम्हालाही योग्य पर्यटक निवडण्याचा अधिकार आहे, असे आम्ही समजतो.

7) आमच्या शेतात उगवणारे व कोकण प्रांतात उगवणारे अन्न आम्ही अभिमानाने खाऊ घालतो.

(Pudhari Photo)

8) शेती ही सन्मानाने करायची कृती आहे, हे देशविदेशाहून आलेल्या पर्यटकाला पटवून देतो.

9) सेवेचा दर्जा सातत्याने उत्तम देतो.

10) शेतीचे आभासी आणि बेगडी रूप न ठेवता खर्‍याखुर्‍या मातीतल्या कष्टाची जाणीव करून देतो.

11) भविष्यातल्या अन्न निर्मितीच्या गरजेबद्दल कळकळीने किशोर व नव्या पिढीला जागरूक करतो.

12) शेती व पर्यटन, पर्यावरणाची सुरक्षितता अबाधित ठेवून करतो.

मला वाटतं याचं उद्दीष्टांमुळे आम्ही अनेक मान्यताप्राप्त संस्थांच्या कौतुकास पात्र ठरू शकलो. शेतीत पाय ठेवल्यापासून मिळालेला पहिलावहिला पुरस्काररूपी अशीर्वादही शेखरदादांच्या हातूनच! आपल्याच ज्ञातीसंस्थेकडून मिळालेला हा पुरस्कार म्हणजे घरच्यांचा दिलेली शाबासकी. त्यानंतर गेल्या दहा वर्षांत ‘द बेटर इंडिया’ सारखी वेब पोर्टल्स, प्रसिद्ध पर्यटन मासिक लोनली प्लॅनेट, नॅशनल जिओग्राफिक ट्रॅव्हेल, मोटरिंग वर्ल्ड, आणि इतर अनेक वृत्तपत्रांतून, मासिकांतून फार्म ऑफ हॅपिनेस म्हणजेच आनंदाचं शेत कृषी पर्यटन होमस्टेला भरपूर प्रसिद्धी आणि पुरस्कार मिळाले आहेत.

(Pudhari Photo)

पुरस्कार :

  1. शाश्वत शेतीवर आधारित अशा आगळ्यावेगळ्या पर्यटनाच्या कामासाठी मानाचा असा आउटलुक रिस्पॉन्सिबल टूरिजम इंडियाचा 2017 चा गोल्ड पुरस्कार.

  2. ट्रीप डव्हायझर या आंतरराष्ट्रीय वेबपोर्टलवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या जवळ जवळ चाळीस एक पर्यटन केंद्रांपैकी ‘सर्वात उत्कृष्ट’ असण्याचा मान मिळवलाय.

  3. याच ट्रिपऍडवायझर पोर्टलने सतत 3 वर्षे ‘ट्रॅव्हलर्स चॉइस’ सर्टिफिकेशने (2018, 2019 आणि 2020) गौरवलं आहे आणि सतत 3 वर्षे ‘ट्रिपऍडवायझर बेस्ट ऑफ द बेस्ट’ (2021, 2022, 2023) अ‍ॅवॉर्डने गौरवलं आहे.

  4. संपदा यांना 2015 मध्ये ग्रामीण पर्यटनातील योगदानासाठी आयआयपीटीआय (इँटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पीस थ्रू टुरीझम) या विश्वस्तरीय संस्थेकडून राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात आलं आहे.

  5. कृषी प्रधान संस्कृती म्हणजे केवळ शेतीतून आर्थिक यश अशा तकलादू व्याख्येच्या पलीकडे जाण्यासाठीचं बळ आणि दृष्टी ‘आपलं स्वत:चं अन्न पिकवण्याच्या’ कृतीशी जोडलेल्या ‘पर्यटनाच्या’ ‘समंजस’ हेतूनेच दिलं हे खरं!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news