

लांजा : माचाळ पर्यटनस्थळी असणारा भिषाचा कडा म्हणजेच उलटा धबधबा याठिकाणी पर्यटकांना जाण्यास धोकादायक असून या धबधब्याच्या ठिकाणी संरक्षक कठडा उभारण्यात यावा, अशी मागणी तालुका बौद्धजन मंडळ ग्रामीणचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी केली आहे.
सद्या पाऊस जोरदार सुरू असून वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी जिल्हाभरातील पर्यटकांची लांजा तालुक्यातील माचाळ येथे गर्दी होत आहे. थंडगार वारा, पावसाळी दुधाळ धुके, हिरवीगार वनराई, अचानक नजरेस पडणारे वन्यप्राणी, सह्याद्रीचे डोंगरकडे आणि पावसाळ्यात डोंगरकड्यांवरून मनसोक्त कोसळणारे धबधबे हे माचाळचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत आहे. शनिवार व रविवारी या सुट्टीच्या दिवसातून माचाळमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते आहे. स्थानिकांसह परजिल्ह्यातील, अनेक कुटुंब, यासह कॉलेज युवक, युवती, नागरिक माचाळ पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी दाखल होत आहेत. अतिउत्साही व मद्य सेवन करणाऱ्या पर्यटकांकडून माचाळ पर्यटनाला बाधा पोहोचू नये यासाठी पालू-माचाळ ग्रुप ग्रामपंचायतीकडून खबरदारी घेण्यात येत आहे. यासह लांजा पोलिसानीही गस्त सुरू ठेवली आहे. असे असले तरी माचाळ पर्यटनाचा काळजीपूर्वक आनंद घेणे गरजेचे आहे असल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे.
माचाळ येथील मुचकुंदी ऋषी गुहा, पालू, खिंड, ऐतिहासिक पाणवठा, सनसेट पॉईंट, मुचकुंदी नदीचे उगमस्थान, भिषाचा कडा म्हणजेच उलटा धबधबा, अशी लक्षवेधी ठिकाणे असून याठिकाणी पालू ग्रामपंचायतीने सूचना व दिशादर्शक फलक लावले आहेत. मात्र माचाळमध्ये पावसाळ्यात सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारा आणि वाऱ्याच्या वेगाने उलटा फिरणारा सर्वात धोकादायक असा 'भिषाचा कडा म्हणजेच उलटा धबधबा' हा पर्यटकांना धोक्याचा इशारा देत आहे.