

चिपळूण शहर : लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी 16 जानेवारी रोजी चिपळुणातील विरोधक एकवटले. यावेळी मार्कंडी येथे सुमती जांभेकर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत 21 जानेवारी रोजी कंपनीविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याबाबत निर्णय झाला. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन देण्याचे देखील ठरले.
लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात जिल्हाभरातील पर्यावरणप्रेमी एकवटले असून 15 दिवसांपूर्वी लोटे येथील कंपनीच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर कंपनी उत्पादनाची पूर्ण चौकशी करून उत्पादीत रसायन पीकास उत्पादनाला परवानगी देऊ नये व कंपनी बंद करावी, अशी मागणीदेखील करण्यात आली. या संदर्भातील अहवाल तातडीने उपलब्ध व्हावा, अशी मागणी देखील करण्यात आली. एकूणच कंपनी बंद करावी या मागणीसाठी आंदोलकांनी आता आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार 21 जानेवारीला जन आंदोलन करण्याच्या दृष्टीने चिपळुणात बैठक घेण्यात आली. यावेळी अशोक जाधव, उदय घाग, भरत लब्धे, सुमती जांभेकर, अशोक भुस्कुटे, ॲड संकेत साळवी, राजेंद्र आंब्रे, दिनेश माटे, सफा गोटे, विणा जावकर, राम रेडिज, शहनवान शहा, पंकज दळवी, सुनील खेडेकर, अविनाश आखाडे, निर्मला चव्हाण, गुलाबराव राजे आदी उपस्थित होते.