

खेड : तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुणे येथील ‘आपुलकी’ या वंचित व निराधार मुलांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या संस्थेने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमासाठी तालुका पत्रकार संघाने सहकार्य करीत समन्वयाची भूमिका बजावली आहे. संस्थेमार्फत तालुक्यातील 30 गरजू शेतकऱ्यांना प्रत्येकी 4 हजार रुपये किमतीची वस्तू स्वरूपात मदत दिली जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांसह अत्यंत बेताच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या गरजूंनाही आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच परिस्थितीअभावी शिक्षणापासून दूर राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तालुक्यातील 30 गरजू शेतकऱ्यांची निवड करून छोटेखानी कार्यक्रमात ही मदत सुपूर्द करण्यात येणार आहे. यावेळी आपुलकी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मनोज दांडेकर, सचिव राजेंद्र बेलवलकर, खजिनदार मेधा बेलवलकर, सदस्य सुनीता तिकोने, अश्विनी नायर, भीमराव नाईक, बाबू बोस, उद्योजक उत्तमकुमार जैन, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत चाळके यांच्यासह तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.