

Landslide in Pomendi Khurd, three injured
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी शहरानजीकच्या पोमेंडी खुर्द गावात दरड कोसळल्याची घटना घडली. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये दोन वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे.
या दुर्घटणेत जखमी झालेल्यांमध्ये आशा अमर राठोड (वय ४२), मोहन किसन राठोड (वय २) रोहन जाधव (वय १७) यांचा समावेश आहे. या सर्वांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते अनिकेत चव्हाण तसेच तलाठी वैभव शेंडे यांनी धाव घेतली. जखमी तिघांवर जिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून कोकण भागात पाऊस सुरूच आहे, सतत पडणार्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकण, गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रात जे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, ते येत्या 36 तासांमध्ये अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
या अनुषंगाने महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या काळात वार्याचा वेग हा 35 ते 40 किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो, तर काही ठिकाणी तो ताशी 60 किलोमीटर इतका सुद्धा असण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
जिल्ह्यात सलग तिसर्या दिवशी पावसाचा जोर कायम होता. काही भागात पडझडीच्या घटना घडल्या आहेत. रत्नागिरीमध्ये मिर्या-नागपूर हायवेचे काम सुरु असून, फिनोलेक्स कॉलनीनजीक उद्यमनगर ते परटवणे दरम्यान बिबटीचा पर्या येथे रस्त्याचा भाग खचला आहे. त्यामुळे या मार्गावरुन वाहतूक बंद करण्यात आली आहे. जुन्या रस्त्याने तात्पुरती वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. भाट्ये मार्गावरही सुरुबनातील झाडे पडल्याने वाहतूक संथ झाली होती. हवामान विभागाने किनारपट्टीवर 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील व जोरदार पाऊस पडेल, असा इशारा दिला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेले तीन दिवस सातत्याने कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपून काढले आहे. गुरुवारी दिवसभर थांबूनथांबून पाऊस पडत होता. दुपारनंतर काळाकुट्ट अंधार करुन पावसाने चांगली हजेरी लावली होती. गुरुवारी पहाटेही जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे सकाळी गारवा निर्माण झाला होता.
रत्नागिरीमध्ये मिर्या ते नागपूर हायवेचे काम शहरालगत सुरु असून उद्यमनगर ते परटवणे जाणार्या नव्या मार्गाचा भाग बिबटीचा पर्या येथे कोसळला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आणि जुन्या मार्गावरुन वळवण्यात आली होती. पहिल्याच पावसात पर्याजवळीला भाग कोसळल्याने महामार्गाच्या कामाच्या दर्जाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रांताधिकारी जीवन देसाई यांना याची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.