

रत्नागिरी : शहरानाजीकच्या भाटीमिर्या येथे क्षुल्लक कारणातून एकाने कुर्हाडीने केलेल्या हल्ल्यात दोघेजण किरकोळ दुखापत झाले. ही घटना सोमवारी 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा. सुमारास घडली. याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रशेखर अनंत कचरेकर, संतोष अनंत कचरेकर (दोन्ही रा. भाटीमिर्या, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात साहिल नीलेश भाटकर (23, रा. भाटीमिर्या, रत्नागिरी) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी आणि संशयित हे एकाच परिसरात राहतात. यातील संशयित चंद्रशेखर हा गेल्या काही दिवसांपासून गावातील येणार्या जाणार्या लोकांना काही कारण नसताना शिविगाळ करत भीती दाखवणे असे प्रकार करत होता.
सोमवारी सायंकाळी फिर्यादी साहिलेचे आजोबा शंकर भाटकर हे घराशेजारी फळे काढत असताना संशयित चंद्रशेखरने त्यांना कुर्हाड दाखवून तुला ठार मारुन टाकेन असे बोलून शिवीगाळ केली. म्हणून फिर्यादी साहिल आणि त्याचा मित्र व साक्षिदार या दोघांनीही आजोबा शंकर भाटकर यांना बाजूला नेले. या गोष्टीचा राग आल्याने संशयित चंद्रशेखर त्या दोघांनाही मारायला कुर्हाड घेउन आला.
या तिघांमध्ये झालेल्या झटापटीत साहिलच्या पोटाला आणि त्याच्या मित्राच्या डाव्या हाताच्या दंडाला कुर्हाड लागून किरकोळ दुखापत झाली. त्यांचा आवाज ऐकून संशयित संतोष कचरेकरही त्याठिकाणी आणि त्यानेही फिर्यादी आणि त्याच्या मित्राला शिविगाळ व दमदाटी केली. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.