

पावस : रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथे मोठ्या प्रमाणात कातळ परिसर असल्याने त्यावर उगवलेल्या गवताला वणवा लागल्याने त्याची झळ बसून पावस -पूर्णगड मार्गावर निकिता राजेंद्र रसाळ यांच्या हार्डवेअर सामान असलेल्या गोदामाला आग लागली. या घटनेत सुमारे 26 लाखांचे नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषद व फिनोलेक्स कंपनी यांच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली.
गेले दोन-तीन दिवस थंडीची लाट असल्याने वार्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी या कातळ परिसरात प्रमाण मोठ्या प्रमाणात गवत वाढत असल्यामुळे वणव्याच्या घटना घडतात. मंगळवारी सकाळीही या परिसरामध्ये वारा असल्याने कातळातील गवत वणव्यामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. याच भागात रसाळ यांचे गोडाऊन असल्यामुळे ते वणव्यात सापडून खाक झाले.
सौ. रसाळ यांचे पावसमध्ये दुकान असून, या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक सामान, रंगाचे डबे, ताडपत्री, पाण्याच्या टाक्या प्लास्टिकच्या अनेक प्रकारच्या वस्तू साठवण्यात आलेल्या होत्या. मंगळवारी अचानक लागलेल्या वणव्यामध्ये त्यांचे नुकसान झाले. वणव्यामुळे गोदामापर्यंत पसरलेल्या आगीची माहिती मिळताच रत्नागिरी नगरपरिषद व फिनोलेक्स कंपनीचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये सुमारे 26 लाख 17 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात मेर्वी येथील तलाठी श्रीमती मीनाक्षी कदम यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी पोलीस पाटील पोलीस अंमलदार गोडाऊन मालक व ग्रामस्थ उपस्थित होते.