

खेड : कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या तिसर्या व चौथ्या टप्प्यांतर्गत संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या बदल्यात अद्याप पर्यायी जमीन व संपूर्ण पॅकेज न मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील प्रकल्पग्रस्त दीपक भिकाजी मोहिते यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी 26 जानेवारी रोजी जीवन समर्पण आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
या संदर्भात दि. 19 नोव्हेंबर 2025 रोजी अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी दीपक मोहिते यांना कोकण विभागीय आयुक्तांना पाठवलेल्या पत्राची प्रत दिली आहे. या पत्रात मोहिते यांच्या जीवन समर्पण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुढील कार्यवाहीबाबत आयुक्तांचे मार्गदर्शन मागण्यात आले आहे.
मात्र, सदर पत्र प्राप्त होऊनही शासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने मोहिते यांनी आपण आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे संबंधित सर्व यंत्रणांना कळवले आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या अनेक कुटुंबांनी आपले संपूर्ण जीवन प्रकल्पासाठी समर्पित केले असतानाही, त्यांच्या मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मोहिते यांनी केला आहे. यापूर्वी त्यांनी 1 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाकडे निवेदन सादर केले होते. मात्र, आजतागायत कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.