Konkan Agriculture Updates | थंडी गायब; आंबा बागायतदार चिंतेत

कोकणात तापमान वाढल्याने मोहोरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता
Konkan agriculture updates
Konkan Agriculture Updates | थंडी गायब; आंबा बागायतदार चिंतेतPudhari Photo
Published on
Updated on

गुहागर शहर : कोकणातील हापूस आंबा बागायतदारांसाठी हंगामी उत्पहन्नाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे डिसेंबर-जानेवारी महिन्यात येणारा मोहोर होय. या काळात सलग कमी तापमान राहिल्यास मोहोर योग्य प्रमाणात येतो व टिकून राहतो. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली थंडी अचानक ओसरल्याने आंबा बागायतदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. वातावरणातील तापमान वाढल्याने मोहोरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कृषीतज्ज्ञांच्या मते हापूस आंब्याच्या गुणवत्तापूर्ण मोहोरासाठी आणि भरघोस उत्पादनासाठी किमान 14 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान सलग 21 दिवस आवश्यक असतात. या थंड हवेमुळे झाडाची वाढ नियंत्रित राहते आणि फुलोर्‍यातील स्थिरता टिकते. मात्र रत्नागिरी परिसरात मागील पाच-सहा दिवसांपासून सकाळ-संध्याकाळची थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. दिवसाचे कमाल आणि किमान तापमान दोन्ही वाढल्यामुळे मोहोर कुजण्याची, किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची तसेच मोहोर पूर्णपणे गळून पडण्याची भीती बागायतदार व्यक्त करीत आहेत.

याबाबत शेतकर्‍यांसाठी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. बागांमध्ये नियमित स्वच्छता ठेवणे, गळून पडलेले मोहोर त्वरित काढून नष्ट करणे, किडींची वाढ रोखण्यासाठी औषधफवारणी करणे, हवामान अंदाजावर सतत लक्ष ठेवणे, स्थानिक हवामान केंद्रांच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, तापमानात झालेली वाढ काही अंशांनी जरी दिसत असली तरी त्याचा आंबा उत्पादनावर मोठा प्रभाव पडू शकतो. वातावरणातील आर्द्रता आणि उष्णतेचा तीव्र बदल हे किडींसाठी पोषक वातावरण ठरू शकते.

काही बागायतदारांनी मोहोर लवकर यावा म्हणून कल्टार वापरले होते. यामुळे त्यांच्या बागांत काही प्रमाणात मोहोर दिसू लागला आहे. परंतु ज्यांनी नैसर्गिकरीत्या मोहोर फुटण्याची वाट बघितली, त्यांच्यासाठी थंडीचा ओसरलेला परिणाम अधिक धोकादायक ठरू शकतो. नैसर्गिक मोहोर फुटणे थंडीवर अवलंबून असल्याने आता तो लांबणीवर जाण्याची किंवा कमी प्रमाणात येण्याची शक्यता वाढली आहे.

अवकाळी पावसामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आंबा उत्पादनास मोठा फटका बसला. नुकतीच सुरू झालेली गुलाबी थंडी बागायतदारांसाठी आशेचा किरण ठरणार होती. परंतु, थंडी पुन्हा ओसरल्याने संपूर्ण क्षेत्रात निराशा पसरली आहे. हवामानाचा लपंडाव सुरूच राहिल्यास यंदाचा हापूस हंगाम आव्हानात्मक ठरू शकतो. बागायतदार, कृषीतज्ज्ञ व प्रशासन यांच्यात समन्वय वाढवण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे.

पुढील काही दिवसांचे वातावरण हाच आगामी मोसमाचा निर्णायक क्षण ठरणार आहे. गुलाबी थंडी आणखी पंधरा दिवस राहिली असती तर उत्तम आणि निरोगी मोहोर टिकला असता. पण आता हवामान बदलामुळे मोहोर गळून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे बागायतदार चिंतेत पडला आहे.

Konkan agriculture updates
Ratnagiri News : विनातिकीट प्रवास अजामीनपात्र गुन्हा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news