

AI in Farming
चिपळूण : कोकणातील कृषी विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला जात आहे. या संदर्भात माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांना विशेष चर्चेसाठी आमंत्रित केले होते. शुक्रवारी ‘सिल्व्हर ओक’ येथे ही बैठक झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात भव्य चर्चेला उधाण आले.
या बैठकीत शरद पवार आणि आमदार निकम यांच्यात कोकणातील पारंपरिक शेती पद्धती, तंत्रज्ञानाचा वापर, हवामानानुसार पीक पद्धती, शाश्वत शेती आणि युवकांना कृषी क्षेत्रात आकर्षित करण्याबाबत सखोल चर्चा झाली. आमदार निकम यांनी कोकणातील स्थानिक शेतीच्या समस्यांचा वेध घेतला.
यावर उत्तर देताना शरद पवार यांनी कृषी तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण, हवामान अंदाज, पीक संरक्षण, रोबोटिक्स, ड्रोनच्या वापराबाबत माहिती दिली. पवार यांनी स्पष्ट केले की, कोकणासारख्या निसर्गसमृद्ध भागात एआयचा वापर केल्यास शेती अर्थव्यवस्थेला महत्त्वाची मदत होऊ शकते. या चर्चेचा पुढील टप्पा म्हणून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात कृषी संशोधन संस्था आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या सहभागाने एक विशेष समिती लवकरच स्थापन केली जाणार आहे.
यामुळे अत्याधुनिक एआय सेंटर उभारण्यासाठी संभाव्य ठिकाणांची पाहणी करण्यात येणार आहे.या घडामोडीमुळे कोकणात आधुनिक कृषी क्रांतीचा एक नवा अध्याय सुरू होण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. आमदार शेखर निकम यांनी अशा उपक्रमांना सहकार्य देण्याची ग्वाही दिली असून, भविष्यात कोकणातील शेतकर्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.