

मुंबई (पुढारी वृत्तसेवा): कोकणातील साकवांचे मजबुतीकरण आणि विकास करण्यासाठी गुरुवारी (दि. ५ जून) गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कोकणातील सर्व साकवांची गावनिहाय माहिती संकलित करून स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीस ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले प्रत्यक्ष उपस्थित होते, तर कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित बांधकाम विभागांचे अधिकारीही या चर्चेत सहभागी झाले.
ना. कदम यांनी यावेळी स्पष्ट निर्देश दिले की, साकवांची उंची, दळणवळणावरील प्रभाव, पावसाळ्यातील अडथळे यांचा अभ्यास करून काही साकवांचे रूपांतर कायमस्वरूपी पुलांमध्ये करता येईल. त्यासाठी नवीन लेखाशीर्ष तयार करून स्वतंत्र निधीची तरतूद करावी, असेही सांगितले.
या निर्णयामुळे कोकणातील पावसाळ्यातील वाहतूक अडचणी कमी होतील आणि ग्रामीण भागातील नागरीकांना वर्षभर सुरळीत दळणवळण सुविधा मिळेल. यामुळे पायाभूत सुविधा बळकट होऊन ग्रामविकासालाही गती मिळणार आहे.