

खेड (रत्नागिरी) पुढारी वृत्तसेवा
कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून, खेड नगरपरिषद निवडणुकीत आज महायुतीकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा अर्ज मोठ्या जल्लोषात दाखल करण्यात आला.
शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीतर्फे हा अर्ज दाखल करण्यात आला असून, यावेळी गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. खेड बसस्थानकाजवळील शिवसेनेच्या प्रचार कार्यालयापासून ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी आणि जल्लोषाच्या वातावरणात कार्यकर्त्यांची मिरवणूक निघाली.
या उत्साही मिरवणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. परिसरात “महायुती विजयाच्या मार्गावर” अशा घोषणा दिल्या जात होत्या.
या वेळी माजी आमदार संजय कदम, माजी खासदार सदानंद चव्हाण, श्रेया कदम, शशिकांत चव्हाण, सचिन धाडवे, कुंदन सातपुते, भाजप जिल्हा प्रमुख सतीश मोरे, ऋषिकेश मोरे आणि अनिकेत कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नगराध्यक्ष पदाच्या महायुती उमेदवार सौ. माधवी बुटाला यांच्यासह इतर उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्त करण्यात आले.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी महादेव रोडगे देखील उपस्थित होते. या प्रसंगी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, “खेड नगरपरिषदेत महायुतीचा झेंडा नक्कीच फडकणार आहे.
जनतेचा विश्वास आणि विकासाचे बळ आमच्याबरोबर आहे. खेडच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकजुटीने प्रयत्न करणार आहोत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्ष पदाच्या अर्जदाखलीनंतर खेड शहरात कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, महायुतीच्या प्रचाराला आता वेग येणार आहे.