Ratnagiri News : रत्नागिरीत रापणीत सापडतोय जेलीफिश!

पांढऱ्या स्वच्छ किनारपट्टीवरील मच्छीमार हैराण; मेहनत व खर्च दोन्ही वाया
Ratnagiri News
रत्नागिरीत रापणीत सापडतोय जेलीफिश!
Published on
Updated on

नीलेश शिरधनकर

रत्नागिरी : रत्नागिरी शहराजवळील पांढरा समुद्र किनारपट्टीवरील मच्छीमारांचे हाल सध्या वाढले आहेत. पारंपरिक रापण पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना गेल्या काही दिवसांपासून जाळ्यात मोठ्या प्रमाणात झराम (जेलीफिश) सापडत आहे. परिणामी, त्यांची मेहनत, वेळ आणि खर्च सगळेच पाण्यात जात आहेत. समुद्रावर उपजीविका अवलंबून असलेल्या मच्छीमारांचे उत्पन्न घटल्याने त्यांच्यासमोर उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला आहे.

Ratnagiri News
Ratnagiri Politics : उमेदवारांची निवड करताना नेत्यांची दमछाक

पांढरा किनाऱ्यावर दररोज पहाटे मच्छीमारांचे गट 20 ते 25 जणांच्या टीमने समुद्रात उतरतात. सोमवारी पहाटे 2 वाजता टाकलेली रापण ओढायला तब्बल पाच तासांचा कालावधी लागला. मात्र, हाती लागलेले उत्पन्न केवळ काही किलो बांगडा, कर्ली, खवली असा किरकोळ मासा आणि त्याच्याही दुप्पट प्रमाणात जेलीफिश! रापणीत सापडलेला जेलीफिश फेकताना मच्छीमारांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. कारण जेलीफिशच्या स्पर्शामुळे शरीरावर खाज सुटणे, सूज येणे आणि काही वेळा जळजळ होणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे मच्छीमारांच्या आरोग्याला धोक्या पोहचण्याची शक्यता आहे.

मत्स्य तज्ज्ञांच्या मते, समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढल्यामुळे आणि प्रदूषणामुळे झराम किनाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात वाढतो. समुद्रात नद्या मिसळण्याच्या ठिकाणी पाण्यातील पोषक घटक वाढतात, त्यामुळेही झराम प्रजनन करतो. अशा वेळी तो मास्यांच्या नैसर्गिक स्थलांतर मार्गात अडथळा निर्माण करतो. काही दिवसांपूर्वी आलेल्या मोंथा वादळामुळे ‌‘समुद्रात प्रवाह बदललेत, तापमान वाढलंय, त्यामुळे झराम किनाऱ्यावर येतो. तो जाळ्यात अडकला की मासे दूर जातात,‌’ अशी माहिती मच्छीमाराने दिली. झराममुळे प्रत्येक रापणीत तोटा होतो. दिवसागणिक हा तोटा वाढत चालल्याने अनेक मच्छीमारांनी मासेमारी तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‌‘दोन दिवस काम केलं की तीन दिवस तोटाच होतो. आता खर्च काढायचा तरी कुठून?‌’ असा प्रश्न मच्छीमार विचारत आहेत.

स्थानिक मच्छीमार संघटनांनी मत्स्य विभागाकडे लेखी निवेदन देऊन तसेच प्रभावित मच्छीमारांना तातडीची आर्थिक मदत आणि जाळ्याचे नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ‌‘दरवेळी नवीन संकटं येत आहेत. वादळं, खवळलेला समुद्र आणि आता हा झराम! समुद्रावर जगणं दिवसेंदिवस अवघड होत चाललंय,‌’ असा संताप पांढरा किनाऱ्यावरील अनुभवी मच्छीमाराने पुढारीशी बोलताना व्यक्त केला.

उपाययोजना आवश्यक या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास पुढील काही आठवड्यांत झरामचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मत्स्य विभागाने समुद्रातील पाण्याचे तापमान, ऑक्सिजन पातळी आणि प्रदूषणाचा अभ्यास करून तातडीने उपाययोजना हाती घेणे अत्यावश्यक असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. एकूणच जेलीफिशमुळे मच्छीमारीवर मोठ्या प्रमाणात संकट निर्माण झाले आहे.

Ratnagiri News
Ratnagiri politics : खेड न.प. निवडणुकीत महायुतीचा ‌‘फॉर्म्युला‌’!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news