

रत्नागिरी : एकवेळ विधानसभा, लोकसभा निवडणुका परवडल्या, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या की सर्वच नेत्यांना कसरत करावी लागतेय. तसाच अनुभव सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच पक्षांची नेतेमंडळी घेताना दिसत आहेत. नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवार निवडताना दमछाक होताना दिसत आहे. शिवाय उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांची नाराजीही ओढावून घेण्याची वेळ नेते मंडळींवर आलेली आहे.
जिल्ह्यातील 7 नगर परिषद व नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान होत आहे. यासाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज भरले जाणार आहेत. सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींच्या जोरबैठकाही वाढलेल्या आहेत. बदलती राजकीय परिस्थिती, नगराध्यक्षपदासाठी पडलेले आरक्षण, त्यासाठी योग्य क्षमतेचा उमेदवार, तो उमेदवार किती खर्च करू शकेल, पक्षावरील निष्ठा यांचा सारासार विचार नेतेमंडळी करताना दिसत आहेत. नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडून द्यावयाचे असल्याने त्यासाठी योग्य उमेदवार शोधतानाही नेते मंडळींचा कस लागत आहे. याशिवाय नगरसेवकपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्याने त्यातून कोणाला उमेदवारी द्यायची हा मोठा प्रश्न नेत्यांना पडला आहे. तब्बत पाच वर्षानंतर नगरपालिकांच्या निवडणुका होत असल्याने गेली पाच वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची की पक्षात उमेदवारीसाठी आलेल्या अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यायची यावरूनही राजकीय पक्षांमध्ये जोरदार घमासाम सुरू झाल्याचे जाणवते.
सत्ताधारी महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा समावेश आहे. काही नगरपालिकांमध्ये युतीतील पक्ष एकमेकांविरोधात असल्याचे सांगितले जाते. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात अजून तरी म्हणाव्या निर्णायक हालचाली दिसत नाही. काही ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाचेे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. त्यामुळे महायुती एकसंध राहील की शेवटच्या क्षणी फुटेल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात युती विरुद्ध आघाडी आहे. मात्र या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर युती आणि आघाड्यांमधील घटक पक्षांत अद्याप सूर जुळ- लेले दिसत नाही. सत्तेत राहिलेले पक्ष मित्र पक्षाला जागा सोडताना हात आखडता घेताना दिसत आहेत. त्यामुळे युती आणि आघाड्यांमधील नेत्यांचे जागा वाटपाचे गुऱ्हाळ रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवसापर्यंत सुरू होते, ते आगामी तीन-चार दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. आपल्या हक्काच्या जागा न सोडता आपल्या वाट्याला जास्तीत जास्त जागा मिळवून घेण्याचा सर्वच पक्ष प्रयत्न करीत असताना दिसून येत आहे. त्यामुळे युती आणि आघाडीतील घटक पक्ष यांच्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रस्सीखेच दिसून येणार आहे. पुढील काळात युती आणि आघाडीतील जागा समाधानकारक होते की घटक पक्ष स्वबळावर मैदानात उतरतात. हेही महत्त्वाचे ठरणार आहे. अद्याप तरी प्रत्येक पक्ष समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळाची तयारी करीत असल्याचे सांगण्यात आहेत.
पक्ष कार्यालये गजबजली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आदी पक्षांची कार्यालये आता नेते आणि कार्यकर्त्यांच्या वर्दळीने गजबजून गेल्याचे जाणवत आहे. गाड्यांचा ताफा कार्यालयाबाहेर उभा असताना दिसू लागल्याने परिसराला जाग आल्याचे दिसत आहे. इच्छुक उमेदवार आपल्या नेत्यांना समर्थकांसह येताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांच्या गोतावळ्यात नेतेही खूष झाल्याचे जाणवत आहे. निवडणुका सुरू झाल्याचे वातावरण आता निर्माण होत आहे.