

रत्नागिरी : शहरातील स्टेडियम येथील गॅलरीच्या पायर्यांवर बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणार्या संशयिताला स्थानिक गुन्ह अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 1 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी सायंकाळी 6.55 वा. करण्यात आली.
जिल्ह्यामध्ये अवैध मटका जुगार खेळाला प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नितीन बगाटे,अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामूनी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली या शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना मारुती मंदिर परिसरात एक संशयित हस्तकांकरवी लोकांकडून पैसे स्विकारुन मटका जुगार खेळ चालवत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी स्टेडियमच्या गॅलरीकडे जाणार्या पायर्यांवर संशयित बसून काहीतरी लिहित असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी तो काय लिहित आहे याची खात्री केल्यावर तो जुगार खेळ चालवत असल्याचे निदर्शनास आले. संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस फौजदार सुभाष भागणे, पोलिस हवालदार बाळू पालकर, विक्रम पाटील, अमित कदम आणि सत्य्जत दरेकर यांनी केली.