

चिपळूण : क्षुल्लक वादाचे रूपांतर भीषण शोकांतिकेत झाल्याची एक मन हेलावून टाकणारी घटना शहरात घडली. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या एका नवदाम्पत्याने किरकोळ वादातून थेट गांधारेश्वर पुलावरून वाशिष्ठी नदीच्या पात्रात उडी घेतली. या घटनेने संपूर्ण चिपळूण शहर हादरले असून, मूळच्या धुळे जिल्ह्यातील या दाम्पत्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले, यावर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना बुधवारी (दि. 30) सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
पती नीलेश रामदास अहिरे (वय 26) व पत्नी अश्विनी नीलेश अहिरे (19, सध्या रा. पागनाका चिपळूण, मूळचे साकरी, जि. धुळे) हे दोघे सकाळी गांधारेश्वर येथे मोटारसायकलवरून दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर चिपळूण रेल्वे स्टेशनकडे जात असताना त्यांच्यामध्ये वादविवाद निर्माण झाला. त्यामुळे ते दोघेही रेल्वे स्टेशनच्या रस्त्यावरून माघारी फिरले व गांधारेश्वर पुलावर आले. यावेळी त्यांच्यातील वाद विकोपाला गेला आणि पत्नी अश्विनी हिने त्याच रागाच्या भरात कोणताही विचार न करता वाशिष्ठी पात्रात उडी घेतली. त्या मागोमाग पतीनेही त्याच ठिकाणी उडी घेतली, असे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले.
ही घटना ज्यांनी पाहिली त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दोघेही बुडाले होते व दिसेनासे झाले होते. त्यामुळे वाचविण्याचा प्रयत्न कोणालाच करता आला नाही. तत्काळ ही माहिती चिपळूण पोलिसांना कळविण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व तत्काळ एनडीआरएफच्या पथकाला तैनात करण्यात आले. एनडीआरएफच्या पथकाने गांधारेश्वर मंदिराच्या जवळून वाशिष्ठी नदीपात्रात शोधकार्य सुरू केले. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचे शोधकार्य सुरू होते. मात्र, त्यापैकी कोणीच सापडलेले नाही. धुळे जिल्ह्यातील साक्री येथील मूळचे रहिवासी असलेले निलेश अहिरे व अश्विनी यांचा विवाह मे महिन्यामध्ये झाला होता.