

Chiplun Bus Stand Theft
चिपळूण : चिपळूण मध्यवर्ती एसटी आगारात रविवारी सकाळी प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चोरीत चोरट्याने 15 इंच लांबीची, 23 ग्रॅम वजनाची आणि अंदाजे 1 लाख रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. याबाबत शीतल शांताराम चाळके (वय 60, रा. लोटेमाळ, चाळकेवाडी, ता. खेड) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
शीतल चाळके या आपल्या भाची रूची संतोष शिर्के (20) हिच्यासोबत दोनवली-गांग्रई एसटी बस पकडण्यासाठी सकाळी 9 च्या सुमारास चिपळूण एसटी स्थानकात आल्या होत्या. बसमध्ये चढत असतानाच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पलायन केले. या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.