

खेड : तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात पी-फास केमिकल निर्मितीच्या मुद्द्यावर वातावरण चांगलेच तापले असून, पी-फास केमिकल तयार करणाऱ्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीला तत्काळ टाळे ठोका, अशी आक्रमक मागणी काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे. या मागणीसाठी गुरुवारी, दि. 8 जानेवारी रोजी, लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीवर भव्य धडक मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चात मोठे टाळे घेऊन जाणार असल्याचा थेट इशाराही हुसेन दलवाई यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे औद्योगिक वर्तुळासह प्रशासनाचेही लक्ष वेधले गेले आहे.
लोटे येथे 8 जानेवारी रोजी होणाऱ्या या धडक मोर्चात कोकणातील आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, सदानंद चव्हाण यांच्यासह विविध पर्यावरणवादी संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी बोलताना हुसेन दलवाई यांनी, कोकणातील माणसाच्या जीवनाशी, आरोग्याशी आणि निसर्गाशी खेळू नका, असा थेट इशारा राज्य सरकारला दिला.
पी-फास केमिकल हे मानवी आरोग्य व पर्यावरणासाठी अत्यंत घातक असल्याचा आरोप करत, अशा केमिकल उद्योगांना कोकणात परवानगी देणे ही गंभीर चूक असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावरही हुसेन दलवाई यांनी जोरदार टीका केली. “पी-फास केमिकल घातक नाही, असे म्हणणाऱ्या मंत्र्यांनी याबाबत सखोल अभ्यास केलेला नसावा, असा आरोप करत, सरकारने या प्रकल्पाबाबत तातडीने पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. या जाहीर धडक मोर्चामुळे लोटे एमआयडीसी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन व पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. उद्याच्या मोर्चाकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष लागले आहे.