New Year Celebration : गणपतीपुळ्यात पर्यटकांचा उत्साह शिगेला
वैभव पवार
गणपतीपुळे : जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचा जल्लोषासाठी दाखल पर्यटकांचा उत्साह शिगेला पोचला आहे. या पार्श्वभूमीवर देश-विदेशातील पर्यटक गणपतीपुळे येथे दाखल होऊ लागले आहेत.
नाताळ सुट्टीच्या कालावधीत अनेक ठिकाणच्या पर्यटकांनी गणपतीपुळेला भेटी दिल्या होत्या. मात्र, आता नाताळ सुट्टीचा हंगाम संपुष्टात येत असल्याने पर्यटकांच्या संकेत काहीअंशी घड झाली. परंतु थर्टी फर्स्ट आणि आणि नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी पुन्हा एकदा पर्यटकांची पावले गणपतीपुळेकडे वळू लागली आहेत. एकूणच सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत असा धमाका साजरा करून पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक पर्यटकांकडून गणपतीपुळे येथील हॉटेल व लॉजिंगमध्ये बुकिंग सुरू केल्याची माहिती स्थानिक व्यावसायिकांकडून देण्यात आली आहे.
अनेकांनी गणपतीपुळे येथे सरत्या वर्षाचा निरोप आणि नवीन वर्षाचा जल्लोष आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी हॉटेल लॉजिंगवर कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे बोलले जात आहे. गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात पर्यटकांच्या गर्दीने 2025 या सरत्या वर्षाला निरोप आणि 2026 या नवीन वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात व प्रचंड जल्लोषी वातावरणात होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, थर्टी फर्स्ट व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होणार असल्याने मंदिर परिसर व समुद्रचौपाटीवर जयगड पोलीस ठाण्याकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच समुद्र चौपाटीवर कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टीने विशेष गस्त घातली जात आहे. या शिवाय विशेष म्हणजे गणपतीपुळे देवस्थान समितीकडून खास लाऊड स्पीकरद्वारे समुद्राच्या धोक्याविषयी व पर्यटकांनी आपल्या सुरक्षिततेविषयी कशा प्रकारे काळजी घ्यावयाची या संदर्भात कॅसेट ऐकवली जात आहे. एकूणच पर्यटकांची मोठी संख्या लक्षात घेऊन स्थानिक यंत्रणांकडून चोख नियोजन करण्यात आले आहे.

