

जयंत निमगडे
गडचिरोली : नक्षलवादी कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव नंबाला केशवराव ऊर्फ बसवा राजू यास ठार मारल्यानंतर नक्षलवादी चळवळीचा खात्मा करणार्या पोलिस जवानांनी दंडकारण्याचा नेता कादरी सत्यनारायण ऊर्फ केसा आणि राजू या दोन केंद्रीय समिती नेत्यांचा खात्मा केला. दोन दिवसांपूर्वी मोस्ट वाँटेड जहाल नक्षली कमांडर माडवी हिडमाच्या छातीची चाळण पोलिसांनी चकमकीत केली. आता पोलिसांच्या निशाण्यावर आहेत जहाल नक्षली नेते गणपती आणि तिरुपती ऊर्फ देवजी.
अन्यायाविरुद्ध लढायचं तर सशस्त्र क्रांती हाच एकमेव मार्ग आहे, या धारणेनं भारावलेल्या 1970 च्या दशकातील तरुण सुशिक्षितांनी नक्षलवादाचा पर्याय स्वीकारला. ही चळवळ नक्षलवादी चळवळ म्हणून पुढं आली आणि सुरुवातीचे हेच लोक या चळवळीचे म्होरके झाले. पुढे तुमच्यावर सातत्याने अन्याय होतो, असं सांगत या म्होरक्यांनी गोरगरीब मागास आदिवासींना आपल्या जाळ्यात ओढलं. त्यापैकी अनेकांनी ‘माओ’ हा शब्दही ऐकला नव्हता. त्यातील जे निरक्षर होते; त्यांच्या हातांनी जंगलातच साक्षरतेचे धडे गिरवले. जे अल्पशिक्षित होते; त्यांना मातृभाषेशिवाय हिंदी आणि काहीअंशी इंग्रजीच्या ज्ञानाचे डोसही पाजण्यात आले. हळूहळू माओवाद्यांचे थिंक टँक काढत असलेली वेगवेगळी मासिकं आणि पुस्तकं त्यांच्या हातात पडू लागली. कुतूहलानं का होईना, नवशिक्षित तरुण-तरुणी ही मासिकं आणि पुस्तकं वाचू लागली.
त्यातूनच प्रस्थापित व्यवस्था आणि सरकार कसे जुलुम करते, हे त्यांच्या मनात रुजू लागले. सोबत वरिष्ठ कॅडरचं बौद्धिक होतंच. त्यातून आदिवासींना ‘माओ’चा परिचय होत गेला. अन्यायाविरुद्ध लढायचे तर रिकाम्या हातांनी लढता येणार नाही, हेही त्यांच्यावर बिंबवण्यात आलं आणि मग एका हातात ‘शास्त्र’ आणि दुसर्या हातात ‘शस्त्र’ अशी समांतर वाटचाल करीत नक्षलवाद्यांची फौज उभी राहिली. रोजच्या उपदेशातून ‘क्रांती ही बंदुकीच्या नळीतूनच येते,’ हे माओेेचं एक वाक्य त्यांच्या गळी उतरविण्यात नक्षलवादी नेते यशस्वी होत गेले; पण अन्यायाचं स्वरूप प्रशासकीय असताना सरकारने नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांना उभं केलं. त्यातून पोलिसच आपले खरे दुश्मन, असं स्वरूप या लढाईला आलं. या लढाईत शेकडो पोलिस शहीद झाले, निव्वळ संशयावरून कित्येक निरपराध आदिवासींची नक्षल्यांनी हत्या केली, तर दोघांच्या भानगडीत हजारो आदिवासी भरडले गेले.
खरं तर 1966-67 च्या सुमारास उत्तर बंगालमधून सुरू झालेली चळवळ 1980 च्या दशकात दंडकारण्यात येऊन स्थिरावली. येथे तिने जवळपास 45 वर्षे हिंसाचार केला. परंतु, जंगलात लपून केवळ बंदुकीच्या जोरावर एवढी वर्षे सरकारला सळो की पळो करून सोडणे शक्य नव्हते. त्यासाठी नक्षलवाद्यांनी चळवळीच्या विस्तारासाठी वेगवेगळ्या शाखा उघडल्या. छत्तीसगडमधील अबुझमाडचं घनदाट जंगल हे या सर्वांचं प्रशिक्षण स्थळ होतं. आदिवासी आणि अन्य अभावग्रस्त स्थानिकांची संस्कृती जपण्यासाठी त्यांनी चेतना नाट्य मंच ही संघटना सुरू केली. त्यातून युवक, युवती एकत्र येऊ लागले. नंतर वेगवेगळ्या भाषेत मासिके प्रकाशित करणारी शाखा वेगळी, शस्त्रांचं प्रशिक्षण देणारी शाखा वेगळी. स्लीपर सेल, शिक्षक सेल, वैद्यकीय सेल, पैसा वसूल करणार्यांचा चमू वेगळा अशा विविध शाखांच्या माध्यमातून कामाची विभागणी करीत आणि जबाबदारीचे काटेकोर पालन करीत नक्षली आपला विस्तार करत गेले आणि टिकले.
अन्याय, अत्याचाराचे स्वरूप सरकारी आणि प्रशासनिक असल्याचे भासवत नक्षलवादी नेत्यांनी जंगलव्याप्त भागातील आदिवासींची सहानुभूती मिळवली. परंतु, टार्गेट केले पोलिसांना. आता पोलिसच नक्षल्यांचे कर्दनकाळ ठरताहेत. बंदुकीला केवळ बंदुकीनेच उत्तर देऊन नक्षलवाद संपवता येणार नाही, त्यासाठी वेगळी भूमिका घ्यावी लागेल, हे पोलिसांच्या लक्षात आल्याने त्यांनी प्रशासनाच्या योजनांची स्वत: अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. हळूहळू आदिवासींचा विश्वास वाढला आणि नक्षल्यांच्या तळांची माहिती होत गेली. नक्षल्यांच्या रणनीतीचा सखोल अभ्यास करून पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर केला आणि ते यशाच्या अंतिम टप्प्यावर पोहोचले.
21 मे 2025 रोजी नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता बसवा राजूला कंठस्नान घातल्यानंतर छत्तीसगडमधील ‘खतरनाक’ कमांडर अशी ओळख असलेल्या माडवी हिडमा यालाही पोलिसांनी यमसदनी धाडले. तत्पूर्वी, नक्षलवाद्यांचा दुसर्या क्रमांकाचा नेता भूपती आणि रुपेश यांना त्यांच्या शेकडो सहकार्यांसह आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. केंद्रीय समिती सदस्य सुजाता हीदेखील पोलिसांना शरण गेली. आता माजी महासचिव मुप्पाला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती, सध्याचा महासचिव थिप्परी तिरुपती ऊर्फ देवजी आणि मिशिर बेसरा हे तिघेच पॉलिट ब्यूरो सदस्य जिवंत आहेत. त्यामुळे सध्याची सरकारची रणनीती बघता मार्च 2026 पूर्वी नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्याच्या गृहमंत्र्यांच्या घोषणेपूर्वीच हे तिघेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले नाहीत तर नवलंच.