

चिपळूण : तालुक्यातील पिंपळी-नांदिवसे रस्त्यावरील पूल खचल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) निविदा जाहीर केली आहे. या पुलासह कालव्यावरील (कॅनॉलवरील) पुलाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. दोन्ही पुलांसाठी एकूण 29 कोटी 27 लाख 79 हजार 982 रुपयांचा खर्च येणार आहे.
ऑगस्ट महिन्यात पिंपळी-खडपोली पूल खचल्याने दसपटी, खडपोली एमआयडीसी परिसरासह आसपासच्या गावांचा संपर्क तुटला होता. परिणामी, विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक, ग्रामस्थ आणि उद्योजकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या मार्गाला पर्याय म्हणून पेढांबे मार्ग अरुंद असल्याने आणि अवजड वाहनांसाठी शिरगावमार्गे मोठा वळसा घ्यावा लागत असल्याने वेळ, पैसा आणि श्रम यांचा अपव्यय होत आहे. घटनेच्या दुसऱ्याच दिशी उद्योगमंत्री व पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन 15 दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर कोकण विभागाचे मुख्य अभियंता सचिन राक्षे यांनीही प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीनंतर पुनर्बांधणीची प्रक्रिया गतीमान झाली.
दरम्यान, खचलेल्या पिंपळी पुलासह कॅनॉलवरील जुन्या पुलाचीही पुनर्बांधणी करण्यात येणार असून 40 ते 45 कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी दोन्ही पुलांसाठी माती परीक्षणाचे काम पूर्ण झाले न त्याचा तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंदाजपत्रक तयार करण्यात आले. अखेर एमआयडीसीने या दोन्ही पुलांसाठी निविदा दोन दिवसांपूर्वी जाहीर केली आहे.