

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांना कोकणात घेऊन जाण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर यावर्षी तब्बल 378 फेर्या सोडण्यात येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या गणपती स्पेशल रेल्वे गाड्यातून मोठ्या संख्येने कोकणवासीय कोकणात दाखल होऊ लागल्याने कोकण रेल्वेच्या सर्वच स्थानकात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लाखो गणेशभक्त रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले आहेत.
गणेशभक्तांच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे ही सज्ज असल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून पाहायला मिळते आहे. कोकण रेल्वेच्या सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर अनेक स्थानकात आकर्षक रांगोळी काढत गणेश भक्तांचे स्वागत केले जात आहे. स्थानकांमध्ये स्वागत कक्ष, भजनी मंडळींसाठी विशेष रंगमंच उभारले गेले आहेत. स्थानिकांना आपली उत्पादने विकता यावी, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पूजा साहित्य व प्रसाद यांचे विशेष स्टॉल उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापर्यंत जाहीर झालेल्या निम्म्याहून अधिक गाड्या कोकणात दाखल होत असून, यातील काही गाड्या खेड, सावंतवाडी, मडूरे पर्यंत तर काही गाड्या पुढील स्थानकांपर्यंत धावणार आहेत.
कोकण रेल्वेच्या वाणिज्य विभागाने आपला अधिकचा कर्मचारी वर्ग विविध स्थानकात बुकिंग काउंटर व माहिती केंद्रासाठी तैनात करत प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली आहे. काही स्थानकांमध्ये स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून मोफत पाणी वाटप करण्याची व्यवस्था व रेल्वेच्या 16 स्थानकात राज्य शासनातर्फे आरोग्यपथके तैनात केली गेली आहेत. रत्नागिरी, चिपळूण, कणकवली सारख्या स्थानकात गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना प्रशासनाकडून केल्या गेल्या आहेत.
मुंबईतून कोकणातील स्थानकात दाखल होणार्या गणेश भक्ताना त्यांच्या गावी पोहोचवण्याकरिता कोकण रेल्वे आणि परिवहन विभागात समन्वय ठेवत काही गाड्या स्थानकातून फिरवण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या आगमनाच्या वेळेवर विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे.रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिस व आरपीएफची पथके तैनात झाली असून रेल्वे सुरक्षा बलाचे 125 कर्मचार, अधिकारी, लोहमार्गचे 48 पोलिस कर्मचारी, पाच अधिकारी आणि 109 होमगार्ड या काळात सुरक्षेची खबरदारी घेणार आहेत.