

Hirabhai Butala death news
खेड शहर: रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खेडच्या सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराचंद परशुराम ऊर्फ हिराभाई बुटाला यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. आज (दि.५) पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. नवी मुंबईतील रेवमॅक्स कंपनीचे मालक कौस्तुभ बुटाला यांचे ते वडील होत.
त्यांच्या निधनाने सहजीवन शिक्षण संस्था परिवार दुःखात बुडाला आहे. खेड मध्ये किराणा मालाचे व्यापारी म्हणून त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाल्यावर खेड तालुका काँग्रेस चे अध्यक्ष नंतर जिल्हा काँग्रेसचे 1985 ते 1990 पर्यंत अध्यक्ष पद भूषविले. त्यांना प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुरस्कार नवी दिल्ली येथे सन्मानपूर्वक देण्यात आला होता.
त्यांचे राज्यातील अनेक जुन्या दिग्गज नेते मंडळी यांच्याशी निकटचे संबंध होते. खेड मधील सहजीवन शिक्षण संस्थेच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. ते 1973 पासून आतापर्यंत सलग 52 वर्षे अध्यक्ष पदावर कार्यरत होते. खेड तालुक्यातील अनेक सामाजिक, राजकीय व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा संबंध होता. खेडमधील त्यांच्या विविध संस्थांमध्ये त्यांना श्रध्दांजली वाहून कामकाज बंद ठेवण्यात आले.