

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या राज्यातील अंशतः अनुदानित, खासगी अनुदानित तसेच जिल्हा परिषदांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ५ हजार ३७० शिक्षकांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही. दिलेल्या मुदतीत ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी अन्यथा कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट व सप्टेंबरचे वेतन मिळणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने तालुकाप्रमुख, शाळेतील मुख्याध्यापकांना पत्र पाठवून ई-केवायसी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये शिक्षिका, महिला कर्मचाऱ्यांची मोठी अडचण होणार आहे. माहेरच्या नावाने नोकरीस लागलेल्या कर्मचाऱ्यांना दुहेरी नावामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
माहेरच्या नावाने नोकरी लागली असेल आणि सासरच्या नावाने आधार कार्ड काढले असल्यास ई-केवायसीत अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शिक्षकांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी तसेच आवश्यक त्या दुरुस्त्या आधार कार्डवर करून घ्याव्यात, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
ई-केवायसीसाठी आता यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबरपूर्वी ई-केवायसी कोणत्याही परिस्थितीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्ण करावी लागणार आहे.
वेतन प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, कर्मचाऱ्यांची अचूक ओळख व नोंदीची पडताळणी करावी यासाठी शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या राज्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र संबंधित वेतन व संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करणे आवश्यक आहे.
"ई-केवायसीसाठी शासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांनी आपली ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय पगार होणार नाही. जिल्ह्यात अद्याप ५ हजार ३७० शिक्षकांची ई-केवायसी प्रलंबित आहे."
— किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प. रत्नागिरी