

रत्नागिरी : महाविकास आघाडीतील विरोधकांमध्ये खिलाडू वृत्ती नाही. विकासकामाच्या जोरावर आणि जनसंपर्कावर निवडणूक लढली पाहिजे; परंतु विरोधक माझ्यासारख्या दिसणार्या डमी व्यक्तीचा स्टेटस ठेवून प्रचारासाठी फिरवत आहेत. माझ्या डमीचा आधार घेऊन हे घाणेरडे राजकारण दुर्दैवी आहे, अशी टीका शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी केली.
शहरातील प्रभाग 1, 3 आणि 5 येथील महायुतीच्या जाहीर प्रचारात ते बोलत होते.उदय सामंत म्हणाले, रत्नागिरी शहरातल्या मुलांना रोजगारासाठी कुठेही जाऊ नये यासाठी परटवणे येथून तीन किलोमीटर अंतरावर मोठा सेमीकंडक्टरचा प्रकल्प होत आहे. वाटद येथे संरक्षणदलाचा बंदुका बनवणारा मोठा प्रकल्प होत आहे.
या दोन्ही प्रकल्पांमुळे तालुक्यातील अनेक बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. एवढे मताधिक्य मिळवा की, भविष्यात तुमचे विरोधक तुमच्यासमोर उभे राहण्याचे धाडस करणार नाहीत. ज्या संख्येने मतदार जमले आहेत त्यावरूनच महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. साठ ते सत्तर टक्के प्रभागात विरोधकांची अनामत रक्कम जप्त होईल, अशी चांगली राजकीय परिस्थिती सर्व प्रभागांमध्ये आहे. विकासाच्या जोरावर आपला विजय निश्चित असला तरी गाफील राहू नका.
एकेक मत महत्वाचे आहे. 1999 पासून माझी राजकीय सुरुवात झाली. मागील आठ निवडणुका लढवणार्या राजन शेट्ये यांच्याकडे पाहिल्यावर आमच्यामध्ये देखील काम करण्याची ऊर्जा निर्माण होते. त्यांच्या प्रभागात दांडगा संपर्क आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराची आवश्यकता भासत नाही. येथील मतदारांच्या जीवावर या प्रभागातील तिन्ही उमेदवार निवडून येतील यांची मला खात्री आहे, असे सामंत म्हणाले.
प्रभाग 1मध्ये नितीन जाधव आणि वैभवी खेडेकर हे भविष्यात चांगले काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रभागात नागरिकांना आवश्य असलेल्या सुविधाबाबत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी माहिती दिली आहे. येथील प्रश्न नागरिकांना समोर बसवून सोडवले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.