

Dilip Vengsarkar Rajapur Memories
राजापूर : राजापूरच्या भेटीत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या आजोळच्या आठवणी भरभरून सांगत दौरा संस्मरणीय केला. यावेळी त्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत राजापूरमधील आपले बालपण, येथे झालेले शिक्षण आणि त्या काळातील शेजारी-नातेवाईक यांचा आवर्जून उल्लेख केला.
वेंगसरकर गुरुवारी (दि.८) आपल्या जन्मगावी राजापूर येथे आले होते. राजापूर शहरातील माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभात महादेव कुलकर्णी हे वेंगसरकर यांचे नात्याने मामा असल्याने, आजोळच्या अनेक आठवणी त्यांनी शेअर केल्या. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ, मिलिंद कुलकर्णी यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.
राजापूरमध्ये दाखल झाल्यानंतर वेंगसरकर यांनी प्रथम आपल्या जन्मस्थानी भेट देऊन परिसराची पाहणी केली व छायाचित्रे काढली. त्यानंतर ज्या इमारतीत त्यांचे बालपण गेले, त्या ठिकाणी सध्या कार्यरत असलेल्या लोकमान्य सहकारी सोसायटीच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पूर्वीचे क्रिकेट आणि आजचे क्रिकेट यामध्ये मोठा बदल झाल्याचे नमूद करताना वेंगसरकर म्हणाले, की पूर्वी क्रिकेटमध्ये फारसा पैसा नव्हता. त्यामुळे खेळाडूंना नोकरी सांभाळून क्रिकेट खेळावे लागत होते. मात्र सध्याच्या काळात क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक संधी उपलब्ध झाल्याने, क्रिकेटमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या खेळाडूंना उत्तम भवितव्य आहे. अलीकडेच भारतीय महिला संघाने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांनी विशेष गौरवोद्गार काढले आणि महिलांसाठीही क्रिकेटमध्ये चांगल्या संधी निर्माण झाल्याचे सांगितले.
लंडनमधील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर सलग तीन कसोटी शतके झळकवणारे दिलीप वेंगसरकर हे एकमेव भारतीय फलंदाज आहेत. या तीन शतकांपैकी सर्वात महत्त्वाचे कोणते, असे विचारले असता त्यांनी १९८६ साली लॉर्ड्सवर केलेल्या नाबाद १२६ धावांच्या शतकी खेळीचा उल्लेख केला. त्या खेळीच्या जोरावर भारताने लॉर्ड्सवर पहिल्यांदाच कसोटी विजय मिळवला होता, ही बाब देशासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. देशाला विजय मिळवून देणारी शतकी खेळी करता आली, याचे मोठे समाधान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
टी-२० क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेटवर परिणाम झाला आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना वेंगसरकर म्हणाले की तसे काही नाही. क्रिकेटचे तिन्ही फॉरमॅट खेळले जाणे ही चांगली गोष्ट असून, प्रत्येक खेळाडूने त्यात समतोल साधणे गरजेचे आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे भारतीय क्रिकेटसाठी मोठे योगदान असून, त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये अजून योगदान द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.