

खेड : कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, खेड तालुक्यातील अनेक नद्या इशारा पातळी ओलांडून वाहू लागल्या आहेत. जगबुडी आणि नारिंगी नद्या दुथडी भरून वाहत असून, या नद्यांनी दिलेली इशारा पातळी पार केली आहे. यामुळे प्रशासन सतर्क झाले असून, सोमवारी 26 रोजी खेड-दापोली राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
खेड-दापोली मार्गावरील फुरूस गावाजवळील पुलाचे काम अद्याप अपूर्ण असून, या ठिकाणी तयार करण्यात आलेला पर्यायी मार्ग पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे. परिणामी, या मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहनांची वाहतूक सध्या मंडणगडमार्गे वळवण्यात येत आहे.
रस्ता मजबुतीकरणाचे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ही मानवनिर्मित आपत्ती उद्भवली असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला हा मार्ग बंद झाल्याने पर्यटकांची गैरसोय झाली आहे. सकाळी 7 वाजेपर्यंत खेड तालुक्यात एकूण 601 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शिर्शी भागात 107 मि.मी. व लवेल भागात 102 मिमी एवढी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात सरासरी पावसाचे प्रमाण 85.85 मिमी इतके आहे. तालुक्यातील प्रमुख ठिकाणी झालेली पावसाचा नोंद(मिलिमीटर मध्ये) पुढील प्रमाणे: खेड 84, भरणे - 84, शिर्शी - 107, आंबवली - 80, लवेल - 102, कुलवंडी - 89, धामणंद - 55 अशी आहे. जगबुडी नदीची पातळी सहा मीटर एवढी इशारा पातळीच्या वर असून, मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्यास ती धोक्याची पातळी गाठू शकते. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, नदीनजीकच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यातील शिवतर मार्गावर चाकाळे कोळकेवाडी येथील बस थांब्या पासून काही अंतरावर मोठा वृक्ष पडून रस्ता रहदारीसाठी बंद झाला होता. बांधकाम विभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने झाड बाजूला कडून वाहतूक पूर्ववत केली.