

प्रवीण शिंदे
दापोली : दापोली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हिवाळ्याचा प्रभाव अधिक तीव्र होत चालला आहे. सलग तीन दिवस किमान तापमानात घट होत असून सकाळी, संध्याकाळी जाणवणारा गारवा दापोलीकरांना अक्षरशः चांगलाच झोंबत आहे. मंगळवारी 8.7 अंश, बुधवारी 7.2 अंश आणि गुरुवारी तब्बल 6.2 अंश सेल्सियस इतकी किमान तापमानाची नोंद झाली आहे. डिसेंबर महिन्यातील हे तापमान दापोलीसाठी लक्षणीय मानले जात आहे.
2019 च्या फेब्रुवारी महिन्यात दापोलीत 4.5 अंश इतके सर्वात कमी तापमान नोंदले गेले होते. त्या तुलनेत यंदाचा डिसेंबरही विक्रमी थंडीची चाहूल देत आहे. हवामान तज्ञांच्या मते, कोकण किनार्यावर उत्तरेकडून येणार्या कोरड्या थंड वार्यामुळे तापमानात अचानक घसरण होत आहे. हवेतील वाढलेला गारवा पर्यटनाला चालना देणारा घटक ठरत असून दापोली, मुरुड, हर्णे, लाडघर, कर्दे, आंजर्ले किनारपट्टीवर येणार्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. पहाटे समुद्रकिनार्यावर गारठा जाणवतो, धुक्याची हलकी चादर पसरते आणि वातावरणातील थंडी ‘हिवाळा दापोलीत पोहोचला’ याची खूण देते.कृषी क्षेत्रातही या हवामानातील
बदलाचा सकारात्मक परिणाम जाणवत आहे. आंबा, काजू, पिकांवर फुलोरा व वाढीसाठी अशी थंडी लाभदायक मानली जाते. गेल्या काही दिवसांपासून तापमान घटल्याने फळ उत्पादक शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र अरबी समुद्रातील ओलावा वाढला किंवा अचानक दक्षिणेकडून उष्ण वारा वाहू लागला तर तापमानात पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, रात्री थंडीचा कडाका वाढत असला तरी दिवसा कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सियस दरम्यान स्थिर असल्याने दुपारी वातावरण तुलनेने उबदार राहते. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी जास्तीत जास्त गारवा जाणवत असून स्थानिक नागरिकांमध्ये उबदार कपड्यांचा वापर वाढत आहे. थंडीची ही लाट पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून दापोलीत हिवाळ्याचा आनंद आता अधिक खुलत चालल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.