

चिपळूण : राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत दि. 7 रोजी शिवसेना पक्षात ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करणार आहेत. यामुळे ठाकरे शिवसेना नेते व आमदार भास्कर जाधव यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. यामध्ये आ. भास्कर जाधव यांचे खंदे समर्थक कळवंडे येथील वसंत ऊर्फ दादा उदेग ग्रामस्थांसह शिवसेनेमध्ये दाखल होणार आहेत.
कळवंडे या ठिकाणी हा पक्ष प्रवेशाचा मोठा कार्यक्रम होणार आहे. सकाळी 11 वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा जंगी पक्ष प्रवेश होईल. यावेळी ग्रामस्थांसह वसंत उदेग शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याशिवाय तालुक्यातील ओमळी या ठिकाणीदेखील प्रवेश होणार आहे. दोन्ही कार्यक्रमांत जि.प. व पं. स.चे माजी सदस्य ठाकरे सेनेची साथ सोडून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आ. भास्कर जाधव यांच्या वर्चस्वाला मोठा सुरूंग लागणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. या पक्षप्रवेशाची जोरदार तयारी करण्यात आली असून आगामी जि. प. व पं. स. निवडणुकीच्या पार्श्वभूूमीवर आ. भास्कर जाधव यांना हा धक्का मानण्यात येत आहे.