

चिपळूण शहर : चिपळूण शहरात सध्या स्ट्रीट फूड खाण्याचा नागरिकांमध्ये ट्रेन्ड वाढला आहे. ४00 ते ५00 हातगाड्यांवरून रस्त्याच्या कडेने विविधप्रकारचे स्ट्रीट फूड विकले जाते. मात्र, अनेकांकडे कोणतेही परवाने नसल्याने व कमी दर्जाच्या असुरक्षित कच्च्या मालापासून खाद्यपदार्थ बनवित असल्यामुळे कमी खर्चात उपलब्ध होणार्या या स्ट्रीट फूडमुळे शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी दक्षता म्हणून संबंधित विभागाने शहरातील स्ट्रीट फूड विक्रेत्यांवर आवश्यक ते परवाने व ग्राहकांच्या सुरक्षेविषयी काळजी घेण्यासाठी नियमांचे बंधन घालावे, अशी मागणी चिपळुणातील हॉटेल व्यावसायिकांनी सोमवारी शहरातील स्वा. सावरकर सभागृहात शहर आयोजि बैठकीत अन्न भेसळ अधिकार्यांकडे केली. यावेळी अन्न भेसळ विभागाच्या प्रमुख अधिकारी भाग्यश्री परदेशी यांनी लवकरच स्ट्रीट फूड विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन दिले.
यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी हा व्यवसाय करताना अनेक अडचणींना प्रामुख्याने तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणींना सामोरे जावे लागते असे सांगितले. त्यातूनही या अडचणी जास्तीत जास्त कमी करून ग्राहकांना नियमावलीनुसार सुरक्षित आणि योग्य सेवा देण्याचे प्रयत्न केले जातात. अशावेळी तपासणी झाल्यास व्यावसायिकांवर नियमावर बोट ठेवून कारवाई होत असते. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी व्यवहार, तांत्रिक अडचणी आणि नियमावली यांची योग्यप्रकारे सांगड घालून कारवाईबाबत सहकार्य करावे. प्रत्येक व्यावसायिक हा कोणत्याही परिस्थितीत जाणूनबुजून नियमांचे उल्लंघन करीत नाही. खाद्यपदार्थ बनविताना बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या कच्च्या मालाचाच वापर करीत असतात. घेतलेला माल हा त्याच्या पॅकिंगवरून शासनाच्या नियमावलीनुसार आहे का नाही, याची खात्री करूनच त्याचा वापर केला जातो. असे असताना एखाद्या कच्च्या मालामध्ये दोष आढळला तर त्यासाठी हॉटेल व्यावसायिकास जबाबदार धरले जाते. मात्र कच्चा माल विक्रेते यातून सुटतात, तर काहीवेळा अनेक हॉटेल व्यावसायिकांना तात्पुरत्या तांत्रिक अडचणी निर्माण होत असतात. मात्र यातून हॉटेल व्यावसायिकांचे व त्यावर अवलंबून असलेल्या शेकडो कुटुंबांचे नुकसान होत आहे.
त्यामुळे संबंधित विभागाने नियमांच्या बंधनात कारवाई करण्यापूर्वी त्या-त्या व्यावसायिकाच्या व्यावहारिक व तांत्रिक अडचणी समजून घ्याव्यात व व्यवसाय करण्याबाबत योग्य मार्गदर्शन करावे. प्रत्येक विभागाच्या सूचनांचे अनेक फलक व्यावसायिकांना आपल्या हॉटेलमध्ये लावावे लागतात. अशावेळी व्यावसायिकांना या गोष्टी अडचणीच्या व त्रासदायक ठरत असतात. त्यामुळे याबाबत तसेच कच्चा माल खरेदीबाबत कोणत्या दर्जाचा असावा, याचेही मार्गदर्शन व्हावे, अशी मागणी केली.
यावेळी अन्न भेसळ विभागाच्या प्रमुख अधिकारी भाग्यश्री परदेशी यांनी, व्यावसायिकांनी जास्तीत जास्त नियम पाळणे गरजेचे आहे; पण काही व्यावहारिक व तांत्रिक अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी सवलत दिली जाईल. मात्र, ग्राहकांचे हीत आणि सुरक्षा लक्षात घेता व्यावसायिकांनी आपले व्यवसाय करावेत, असे आवाहन केले.