

चिपळूण : येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिवसागणिक वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मुंबईतील बैठकीत राष्ट्रवादीला डावलल्याने पदाधिकारी व इच्छुकांमध्ये नाराजी आहे. आगामी दोन तीन दिवसात नगराध्यक्षपदाचे उमेदवार निश्चित होणार असले तरी नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे. यामुळे महायुती व महाविकास आघाडीचे घोडे अडले आहे.
गत निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने सुरेखा खेराडे यांच्या माध्यमातून बाजी मारली होती. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशी चौरंगी लढत झाली होती. थेट जनतेतून झालेल्या या निवडणुकीत यश मिळाल्यानंतर भाजपने यावेळच्या निवडणुकीतदेखील नगराध्यक्ष पदावर दावा केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत नगराध्यक्षपदावरूनच महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे. मात्र तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि आताच्या राजकीय परिस्थितीत मोठा फरक झाला आहे. शिवसेना व राष्ट्रवादीचे विभाजन झाले आहे. या दोन्ही पक्षांची ताकद विभागल्याने त्याचा परिणाम थेट नगगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवर होणार आहे. त्यामुळे महायुतीतील मित्र पक्ष नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यात मुंबईतील बैठकीत राष्ट्रवादीला जाणीवपुर्वक डावलल्याने महायुतीत आलबेल नसल्याचे पुढे आले आहे.
त्याचप्रमाणे महविकास आघाडीच्या दोन तीन बैठका झाल्यातरी नगराध्यक्षपदावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात तिढा आहे. काँग्रेसतर्फे तालुकाध्यक्ष लियाकत शाह हे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, आपला प्रचारच सुरू झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत तर ठाकरे सेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्यासमोर नगराध्यक्षपदाची उमेदवारी काँग्रेसलाच देण्याची मागणी त्यांनी ठामपणे मांडली. त्यामुळे महाविकास आघाडीतही नगराध्यक्षपदावरून तू तू मै मै सुरू राहिले आहे.