

खेड : पुढारी वृत्तसेवा
पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारताने आज पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले. या निर्णायक कारवाईमुळे संपूर्ण देशभरात आनंदाची लाट पसरली असून, खेड शहरातही या विजयाचा जल्लोष करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कारवाईने देशवासीयांच्या मनात असलेला रोष व्यक्त करत पाकिस्तानला करारा प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय महिलांच्या सिंदूरवर झालेल्या आघाताचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची प्रतिक्रिया मिळत आहे.
या ऐतिहासिक कारवाईच्या समर्थनार्थ खेड येथे फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, नंदू साळवी, स्वप्नील सैतावडेकर, आकाश पिंपळकर, पियुष माने, प्रशांत बारटक्के, अतुल शेठ, राकेश मोरे, भूषण कारेकर, अक्षय जांभुळकर, संजय आखाडे यांच्यासह समस्त खेडवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेडकर यांनी सांगितले की, "देशासाठी शत्रूला दिलेले हे प्रत्युत्तर आमचा अभिमान वाढवणारं आहे. या क्षणी संपूर्ण खेड एकजुटीने देशाच्या पाठीशी उभी आहे." या घटनांमुळे देशाच्या सुरक्षाबलांवर जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. खेडमध्ये झालेला हा उत्सव राष्ट्रभक्तीचा प्रतीक ठरला आहे.