

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामडंळाच्या वतीने महिलांना तिकीटात 50 टक्के सवलत, 75 पेक्षा अधिक ज्येष्ठांना प्रवासात 100 टक्के सवलत आहे. मात्र, एसटीने दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेण्यासाठी मोफत बस प्रवासासाठी बनावट आधार, बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा सुळसुळाट सुरू आहे. कित्येकांना बनावट प्रमाणपत्र बनवून, आधारकार्डवर वय वाढवून प्रवास करत आहेत.
कित्येकांकडे चार-चार आधारकार्ड आहेत. त्यामुळे सावधान...बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देवून एसटीने प्रवास करणार्यांवर शासनाची फसवणूक केल्याबद्दल 420 चा गुन्हा दाखल होवू शकतो. पश्चिम महाराष्ट्र, विर्दभात बोगस प्रमाणपत्राचा सुळसुळाट सुरू आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातही बोगस पासचा सुळसुळाट सुरू असून एसटी विभागाकडून तपासणी करून कारवाई करावी अशीच मागणी होत आहे.
एसटी महामंडळाच्या वतीने प्रवाशांसाठी विशेष सवलती दिल्यामुळे लाल परीतून प्रवास करणार्यांची प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ यासह अन्य जिल्ह्यात एस.टी.ने प्रवास करण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे, आधारकार्डचा वापर करून प्रवास करीत आहेत. काहीच दिवसापूर्वी बुलढाणा येथे 60 प्रवाशांवर बोगस प्रमाणपत्र, आधारकार्ड असल्याचे उघड झाले असून त्यांच्याकडील प्रमाणपत्रे, आधारकार्ड जप्त केले आहे. तसेच त्यांच्याकडून तिकीटाचे पैसे ही घेण्यात आले आहे.
रत्नागिरी विभागात ही काही शासकीय कर्मचारी, खासगी कर्मचारी बोगस प्रमाणपत्र, आधारकार्डवर वय वाढवून एसटीचा मोफत प्रवास करीत असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, शासनाची फसवणूक होत असल्याचे निर्दशनास आल्यास संबंधित प्रवाशांवर गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.
कार्ड, प्रमाणपत्र स्कॅन केल्यानंतर कळणार
कित्येक प्रवासी प्रमाणपत्र आहे, आधारकार्ड दाखवून प्रवास करतात. गर्दी असल्यामुळे वाहक कित्येकवेळा कागद बघूनच सोडून देतो. मात्र आधारकार्ड, दिव्यांग प्रमाणपत्रे मोबाईल अॅपमध्ये स्कॅन केल्यास आधारकार्डवरील खरे वय, दिव्यांग प्रमाणपत्र खरे आहे का बोगस हे कळणार आहे. प्रवासी एक आणि आधारकार्ड तीन ते चार वापरत आहे. त्यामुळे आधारकार्डवरील खरे वय काय हे कळेनासे झाले आहे. 45च्या पुढचे ही वय वाढवून मोफत प्रवास करीत असल्याचे उघड झाले आहे.