

गुहागर : प्रभू श्रीराम यांच्या नावाचा वापर करून भाजपने सत्ता मिळवली; मात्र त्यांची श्रद्धा प्रभू रामचंद्रांवर किंवा हिंदुत्वावर नसून केवळ मतांवर असल्याचा आरोप ठाकरे शिवसेना नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी केला. रामरक्षा महाआरती कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या पुढाकाराने गुहागर मतदारसंघात विविध गावांत रामरक्षा व महाआरती कार्यक्रम भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत सुरू आहेत. चिपळूण तालुक्यातील रामपूर, खरवते, गांग्रई, खेड तालुक्यातील चोरवणे, धामणंद, गुहागर तालुक्यातील असगोली, नवानगर, पालपेणे, मुसलोंडी, पिंपर आदी ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांना राम भक्तांची मोठी गर्दी उसळली होती.
यावेळी आ. जाधव म्हणाले की, राम मंदिराच्या उभारणीसाठी हिंदूंसह मुस्लिम आणि विविध जाती-धर्माच्या नागरिकांनी योगदान दिले. मात्र मंदिराच्या उभारणीचे संपूर्ण श्रेय भाजपने घेतल्याचा आरोप जाधव यांनी केला. मंदिराचे उद्घाटन, कलशारोहण आणि ध्वजारोहणाच्या कार्यक्रमांना सिने कलाकारांना आमंत्रित करण्यात आले; मात्र चारही धर्मपीठांपैकी एकाही शंकराचार्यांना आमंत्रित करण्यात आले नाही, असेही त्यांनी सांगितले. राम मंदिराचे सगळे श्रेय तुम्ही घेतले असेल, तर मंदिरात झालेल्या कथित हजारो कोटींच्या चोरीची जबाबदारीही तुम्हीच घ्यायला हवी, असे जाधव म्हणाले.
बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिर उभारण्यासाठी काँग्रेसच्या काळात वटहुकूम काढला गेला नाही, अशी टीका भाजपकडून केली जाते. मात्र १९९६ ते २००४ या कालावधीत भाजप सत्तेत असतानाही वटहुकूम काढण्यात आला नाही. अखेरीस न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिराचा मार्ग मोकळा झाला. तसेच तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी श्रीरामांची पूजा करण्यास परवानगी दिली होती, ही बाब भाजपकडून सांगितली जात नसल्याचेही जाधव यांनी म्हटले.