

बेळगाव ः बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) काही व्यापाऱ्यांच्या कारस्थानामुळे स्थानिक गाजर उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. परराज्यातून गाजर मागविले जात आहे. यामुळे बाजारात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करत बुधवारी (दि. 7) शेतकऱ्यांनी एपीएमसीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
एपीएमसीत गाजरचा दहा किलोचा दर 350 रुपये होता. मात्र, हा दर पाडण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातून गाजर आयात केले. त्यामुळे, स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. नाशिक जिल्ह्यातून आवक केलेल्या गाजराचा प्रति दहा किलोचा दर 180 रुपये आहे. हे दलालांचे एक षड्यंत्र आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. तसेच व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातील गाजर खरेदी करु नये. स्थानिक गाजराला प्राधान्य द्यावे, अशी मागणी लावून धरली.
तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांचा या कृतीचा निषेध करण्यासाठी सकाळच्या टप्प्यात महाराष्ट्रातून आलेल्या वाहनांची एपीएमसी प्रवेशद्वारावर अडवणूक केली. प्रवेशद्वारावरच वाहने रोखून धरली. त्यामुळे, याठिकाणी काही काळ रहदारी कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत शेतकऱ्यांची समजूत काढली व रहदारीला मार्ग मोकळा करुन दिला.