डहाणू : १ नोव्हेंबर पासून पालघर जिल्ह्यातील रेशनिंग दुकानदारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास संपावर जाणार आहेत. या जिल्ह्यात आठ तालुक्यांमध्ये एकूण १०८६ दुकाने शहरी तसेच ग्रामीण भागात असून त्यापैकी डहाणू तालुक्यात २०७ दुकानांचा समावेश आहे. दरम्यान पालघर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती, जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश रिकामे यांनी दिली.
१ नोव्हेंबर पासून राज्यातील रेशानिंग दुकानदारांकडून संपाचे हत्यार उपसले जाणार आहे. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील दुकानदार सहभागी होणार असून या जिल्ह्याच्या आठ तालुक्यातील १०८६ रास्त भाव धान्य दुकादारांचा समावेश आहे. बुधवारी डहाणू तहसीलदारांना निवेदन दिल्याचे रास्त भाव धान्य दुकान परवानाधारक, डहाणू संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जाधव म्हणाले. ऐन दिवाळीत धान्याचे वितरण न झाल्यास त्याचा थेट परिणाम सामान्य तसेच आदिवासी कुटुंबांवर होणार आहे. त्यामुळे दिवाळीचा गोडवा नागरिकांना अनुभवता येणार नाही.
सरकारने योग्यवेळी निर्णय न घेतल्यास दिवाळीसह होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवरही परिणाम होऊ शकतो. महागाईच्या निर्देशांकानुसार मार्जिन मध्ये वाढ होण्यासाठी राज्य फेडरेशन आणि महासंघाने सरकारकडे २०१८ पासून पाठपुरावा केला. मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रास्त भाव धान्य दुकान परवानाधारक यांच्या राज्य भरातील दोन संघटनेच्या जिल्हा, शहर आणि तालुका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीचे आयोजन केले होते. त्यानुसार सरकारकडून मार्जीन वाढविण्याचा निर्णय घेतला जात नाही, तो पर्यंत धान्याचे वितरण न करण्याचे ठरवले आहे. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये अंत्योदय लाभार्थी ५,०६,९७८ आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी १५,०७,९७० अशी एकूण २०,१४,४४८ लाभार्थी आहेत.