

रत्नागिरी : स्व. बाळासाहेब व स्व. प्रमोद महाजन यांच्या माध्यमातून झालेली युती आजही रत्नागिरीत जपली गेलीय. येत्या निवडणुकीत महायुतीच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार 32 नगरसेवकांसह अनेकजणांचे डिपॉझिट जप्त करून विजयी होईल, असा विश्वास रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे व महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यापूर्वी आयोजित जयस्तंभ येथील कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे निवडणूक संयोजक ॲड. दीपक पटवर्धन, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे, राजू महाडीक, भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, स्मितल पावसकर, संजय साळवी, सुदेश मयेकर यांच्यासह महायुतीचे उमेदवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. सामंत म्हणाले की, बत्तीस नगरसेवक पदांसाठी जवळपास मुलाखतीला महायुतीच्या 170 कार्यकर्त्यांनी अर्ज केले होते. त्यातील 32 जणांना उमेदवारी देण्यात आली. नगराध्यक्षपदासाठीही मोठी चढाओढ होती. मात्र जनतेच्या मनातील उमेदवार आम्ही दिलेला आहे. उदय सामंत रिंगणात आहे हे समजून सर्व महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यांना अभिप्रेत असलेली धनुष्य व कमळाची महायुती आम्ही रत्नागिरीत आजही जपलेली आहे. नागरिकांनी भरघोस मतांनी या सर्वांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी या कॉर्नर सभेत केले.
यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा प्रशांत सुर्वे यांनी उमेदवारी दिल्याबद्दल महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. आपण पारदर्शक कारभार करु आणि शहर विकासात वरिष्ठांना अभिप्रेत असलेले योगदान देऊ, असे मत व्यक्त केले. यावेळी भाजपाचे निवडणूक संयोजक ॲड. दीपक पटवर्धन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.