

रत्नागिरी : नगरसेवकाने निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत समाधानकारक आणि अपेक्षित काम न केल्यास त्याला घरी पाठवले जाईल, म्हणजेच त्याचा राजीनामा घेतला जाईल, मग पोट निवडणूक घ्यावी लागली तरी हरकत नाही, असा थेट इशारा उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी दिला.
आगामी रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (शिंदे गट) प्रभाग क्रमांक 5 मध्ये आयोजित केलेल्या संपर्क मेळाव्यात उद्योगमंत्री तथा पालक मंत्री उदय सामंत यांनी आपल्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला आहे. दरम्यान, या मेळाव्यातूनच त्यांनी न. प. निवडणुक प्रचाराचा शुभारंभ केला.
मंत्री सामंत यांनी या मेळाव्यात महायुतीच्या उमेदवारांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. तुमच्या मनात असलेले आणि अपेक्षित असलेलेच उमेदवार निवडणुकीत दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे बोलताना त्यांनी रत्नागिरीतील गेल्या काही वर्षांतील मोठ्या विकासकामांचा पाढा वाचला. यात शिवसृष्टी, स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, लोकमान्य टिळकांचे स्मारक आणि जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस वसाहत, जिल्हा परिषद इमारत यांसारख्या भव्य प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच एज्युकेशन हब म्हणून रत्नागिरीचा विकास करण्याचे आपले स्वप्न होते. त्यादृष्टीनेही वैद्यकीय महाविद्यालय, इंजिनिअरींग कॉलेज व अभ्यासक्रम सुरु झाले आहेत. शहरातील महापालिकेची दामले शाळा 15 कोटी रुपये खर्च करून उभारली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
रस्त्यांच्या स्थितीवर होत असलेल्या टीकेची दखल घेत, चांगल्या कामाचे श्रेय जसा कार्यकर्ता घेतो, तसेच अपूर्ण राहिलेल्या कामांची जबाबदारीदेखील पालकमंत्री म्हणून आपण घेतो आणि लवकरच रस्त्यांचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. रत्नागिरीला एका वर्षात स्मार्ट सिटी बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी जाहीर केले. रत्नागिरी विमानतळाच्या कामाचा उल्लेख करताना सामंत यांनी सांगितले की, टर्मिनल बिल्डिंगचे 60% काम पूर्ण झाले आहे आणि लवकरच मुंबई-रत्नागिरी विमानसेवा सुरू होईल. पुढील पाच वर्षांत काय करणार, हे 365 दिवसांत रत्नागिरीकरांना दाखवून द्यायचे आहे, असे सांगत त्यांनी निवडणुकीतील उमेदवारांवर विश्वास दाखवला. या मेळाव्यात जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, राजेंद्र महाडिक, राजन शेट्ये, भाजपाचे सचिन वहाळकर, बिपीन बंदरकर, सौरभ मलुष्ठे, वसंत पाटील, स्मितल पावसकर, महिला जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे, वैभवी खेडेकर, पूजा पवार, किशोर देसाई, दीपक पवार, पप्पू सुर्वे, विजय खेडेकर, बारक्या हळदणकर यांसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.