गॅस टँकर पलटी झाल्याने कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग सहा तासानंतर पूर्ववत

गॅस टँकर पलटी झाल्याने कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग सहा तासानंतर पूर्ववत

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर जयगडहून कोल्हापूरच्या दिशेने जाताना अपघातग्रस्त एलपी गॅस टँकरमधील गॅस अन्य टँकरमध्ये भरताना सुरक्षेसाठी कोल्हापूर मार्ग जवळपास सहा तास बंद ठेवण्यात आला होता. रात्री 8 नंतर उशिराने या मार्गावरून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

जयगड येथून कोल्हापूरच्या दिशेने जाताना दाभोळे घाटात नियंत्रण सुटून टँकर खोल दरीत बुधवारी सायंकाळी कोसळला होता. यात चालक जखमी झाला. अपघातात टँकरचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या घटनेनंतर जेएसडब्ल्यू कंपनी जयगड येथील गॅस एक्स्पर्ट नीलेश भोसले यांनी टँकरमधील गॅस लिक झाला नसल्याचे सांगितले होते.

गुरुवार, दि. 20 रोजी दुपारी 2 वाजता अपघातग्रस्त टँकरमधील एलपी गॅस दुसर्‍या टँकरमध्ये शिफ्ट करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेुसार महामार्गावरील वाहतूक दुपारनंतर बंद ठेवण्यात आली होती. वाहतूक बंद केल्यामुळे पालीपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. गॅस शिफ्टिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. रात्री आठनंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी अपघातस्थळी साखरपा मुर्शी चेकपोस्टचे पोलिस उपनिरीक्षक कदम व पोलिस कर्मचारी तसेच हातखंबा पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रमसिंह पाटील व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news