मार्गताम्हाणे येथील एमआयडीसी रद्द; उदय सामंत यांची घोषणा | पुढारी

मार्गताम्हाणे येथील एमआयडीसी रद्द; उदय सामंत यांची घोषणा

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : चिपळूण व गुहागर तालुक्यांतील मार्गताम्हाणे आणि देवघर भागात होणारी एमआयडीसी अखेर रद्द करण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केला आहे. चिपळूण व गुहागर तालुक्यांतील 11 गावांतील शेतकर्‍यांचा या एमआयडीसीला तीव्र विरोध असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीच्या गुणगौरव सोहळ्या निमित्ताने उद्योगमंत्री व पालकमंत्री मार्गताम्हाणेत आले होते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, मार्गताम्हाणे येथील शेतकरी व आंबा-काजू बागायतदारांचा एमआयडीसीला तीव्र विरोध आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे. या निर्णयाचा कुणी बाऊ करू नये. गुहागर तालुक्यात अन्यत्र जागा उपलब्ध झाल्यास आणि लोकांची मागणी असेल तर अवघ्या पंधरा दिवसांत एमआयडीसी देऊ असेही ते म्हणाले.
मार्गताम्हाने – देवघर एमआयडीसीवरून आ. भास्कर जाधव आणि ना. उदय सामंत यांच्यात अनेक दिवस वाद रंगला होता. आ. भास्कर जाधव यांनी येथे एमआयडीसी यावी आणि येथील एमआयडीसी रद्द करू नये, अशी मागणी सरकारकडे केली होती. मात्र, शेतकर्‍यांच्या विरोधामुळे अखेर मार्गताम्हाने एमआयडीसी रद्द करण्यात आल्याचे सांगितले. यामुळे आंबा बागायतदारांकडून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, यावेळी कोकणातील वणव्यांबाबत लोकांना नुकसान भरपाई द्यावी म्हणून समिती नेमली आहे. ती समिती योग्य निर्णय घेईल, आणि उपेक्षित राहणार्‍या शेतकर्‍यांना मदत मिळेल, असे सांगितले.
निरामय हॉस्पीटल सुरू होणार…
गुहागर तालुक्यातील वीस वर्षांपासून बंद असलेल्या अंजनवेल येथील निरामय हॉस्पिटल सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या असून यासाठी पुणे येथील ज्ञान प्रबोधिनीकडे चर्चा सुरू आहे. हे रुग्णालय सुरू झाल्यास तालुक्यातील आरोग्याचा प्रश्न संपुष्टात येईल असे सांगितले.
रत्नागिरी जिल्हा नियोजनसाठी राज्य शासनाने 360 कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील रस्ते, साकवासह पर्यटन उपक्रमांना अधिक गती मिळणार आहे. जनतेल्या दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात राज्य सरकार यशस्वी झाले असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.
-ना. उदय सामंत, पालकमंत्री रत्नागिरी-रायगड

Back to top button