रत्नागिरी : अवकाळीने बागायतदार धास्तावले | पुढारी

रत्नागिरी : अवकाळीने बागायतदार धास्तावले

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : ऐन आंबा हंगामाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर झालेल्या अवकाळी पावसामुळेे आणि बदललेल्या वातावरणाचा फटका यंदा आंब्यासह काजूलाही बसणार आहे. नव्याने आलेल्या आंबा कलमांच्या पालवीला फुटवा धरू लागला असताना आणि मोहोर दाणेदार झाला असताना अवकाळी पावसाने बागायतदारांची संकटे वाढविली आहेत. त्यामुळे यंदाचे उत्पन्न घटण्याची शक्यता असून, हंगामही लांबणीवर पडण्याची भीती आता बागायतदारांत आहे.

मागील दोन वर्षे हापूसला नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्या आधी कोरोना संकटामुळे लावलेले निर्बंध आणि नंतर वादळ व पावसाचा फटका तर यंदा अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे कोकणच्या हापूसचा हंगाम लांबणार आहे.
सोमवारपासून तयार झालेले मळभी वातावरणात गेल्या रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे हापूसच्या सुरुवातीच्या हंगामाला पहिला फटका काही कोटी रुपयांत बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे ज्या झाडांना कणी धरली होती, त्यावर आता बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

फवारणीचा अतिरिक्त डोस सुरू असताना पुन्हा एकदा खबरदारी म्हणून फवारणी करावी लागणार आहे. शिवाय फुलोरा झालेल्या झाडांना बुरशी रोग येण्याची दाट शक्यता असल्याने आता दररोज आंबा उत्पादक शेतकर्‍यांना फवारणी करण्याची वेळ आली आहे. अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांसह हापूसच्या बागा घेतलेल्या व्यापार्‍यांचही यामध्ये मोठे नुकसान होणार आहे. साधारणपणे 15 ते 20 फेब्रुवारीपासून हापूस आंब्याचा हंगाम सुरू हातो. मात्र, तो आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने मोहोर गळून पडण्याचे संकट आता समोर आहे.

अवकाळीचा फटका काजूलाही बसण्याची शक्यता आह. काजूचा बहर बहरातच असताना रात्रीच्या अवकाळी पावसाने मोहरावर फुलकिड्यांचा वावर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवळणारा मोहोर खुडण्याची भीती काजू उत्पादकांना लागली आहे. कालपरवापर्यंत अनुकुलतेत सुरू असलेल्या हंगाम यामुळे संकटात सापडला असून त्या फटका उत्पादकासंह व्यापार्‍यांनाही बसणार आहे.

अवकाळी आणखी दोन दिवस

अरबी सागरात चक्राकार वार्‍याची स्थिती कायम असल्याने आणि गुजरातच्या किनारी भागात कमी दाबाचा पट्टा विरळ होऊन किनारपट्टी भागात सरकल्याने पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टी भागात विजांसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांश भागात सोमवारी रात्री सुरू झालेला पाऊस मंगळवारी पहाटेपर्यंत सुरू होता. मंगळवारी दिवसा मळभाचे आच्छादन कायम होते. काही भागांत हलक्या सरींचेही सातत्य होते. त्यामुळे गेले दोन दिवस वाढलेल्या तापमानात घट झाली, तरी अवकाळी पावसाची टांगती तलवार आगामी दोन दिवस राहणार आहे.

Back to top button